Last Updated on 31 May 2026 8:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
मे महिन्यातील कडक उन्हाच्या झळांनंतर आता राज्यातील हवामानात मोठा बदल होण्यास सुरुवात झाली आहे. १ जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन आठवड्यात हवामानात आणखी लक्षणीय बदल होणार असून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीच्या भागातही काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या हवामान बदलामुळे कमाल तापमानात घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार असला, तरी पूर्व विदर्भात मात्र पारा ४० अंश सेल्सिअसच्या वरच कायम राहील.
पेरणीची घाई करू नका; मान्सून अद्याप दूर
हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, आगामी काळात होणाऱ्या या वादळी पावसाचा मुख्य मान्सूनशी कोणताही संबंध नाही. मान्सून अद्याप केरळमध्ये दाखल झालेला नाही. सध्याच्या स्थितीचा अंदाज घेता, राज्यातील बहुतांश भागांत किमान १० जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता नाही. त्यामुळे कृषी विभागाने शेतकरी बांधवांना महत्त्वाचे आवाहन केले असून, या वादळी पावसावर अवलंबून राहून मान्सूनपूर्वी पेरणीची अजिबात घाई करू नये, असा सल्ला दिला आहे.
विजांच्या कडकडाटात काळजी घेण्याचे आवाहन
आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना स्वतःच्या व पाळीव जनावरांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. अशा वेळी झाडांखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि हायव्होल्टेज विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे पूर्णपणे टाळावे, जेणेकरून संभाव्य जीवितहानी टाळता येईल.












































































