Last Updated on 26 Oct 2024 12:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. श्री. मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने दिलेल्या मंजुरीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात २३ जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. शिरोळमधून गणपतराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पहिल्या यादीत त्यांनी ४८ जागांची यादी जाहीर केली होती. आतापर्यंत महाविकास आघाडीकडून १९६ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अर्ज भरण्यासाठी आता दोन दिवस बाकी असताना अजूनही ९२ जागांवर उमेदवार जाहीर करणे बाकी आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट ८०, काँग्रेस पक्ष ७१, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ४५ असे उमेदवार जाहीर केले आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याविरोधात कामठी मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून सुरेश भोयर यांना रिंगणात उतरवलं आहे. या यादीमध्ये सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून मधुकर देशमुख, सावनेरमधून अनुजा सुनील केदार, नागपूर दक्षिणमधून गिरीश पांडव, जालन्यातून विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल व निलंगा येथून अभयकुमार साळुंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने आज जाहीर केलेल्या यादीतून मुंबईतील तीन जागांची घोषणा केली आहे. यामध्ये चारकोप, कांदिवली पूर्व आणि सायन कोळीवाडा या मतदारसंघाचा समावेश आहे.
शिरोळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गणपतराव पाटील हे शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि काँग्रेसचे माजी आमदार आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांचे सुपुत्र आहेत. शिरोळमध्ये आता अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर विरुद्ध काँग्रेसच्या गणपतराव पाटलांमध्ये सामना रंगणार आहे.
हेही वाचा – अजित पवारांचा जयंत पाटील यांना घेरण्यासाठी मोठा डाव; राष्ट्रवादीकडून लढणार तगडा उमेदवार
हेही वाचा – महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष प्रत्येकी ९० जागा लढवणार
हेही वाचा – शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; ‘या’ चेहऱ्यांना संधी
काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर
भुसावळ – राजेश मानवतकर
जळगाव (जामोद) – स्वाती वाकेकर
अकोट – महेश गांगणे
वर्धा – शेखर शेंडे
सावनेर – अनुजा सुनील केदार
नागपूर दक्षिण – गिरीश पांडव
कामठी – सुरेश भोयर
भंडारा – पूजा ठावकर
अर्जुनी-मोरगाव – दलिप बनसोड
आमगाव – राजकुमार पुरम
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल (बाळासाहेब) मंगुळकर
अर्णी – जितेंद्र मोघे
उमरखेड – साहेबराव कांबळे
जालना – कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व – मधुकर देशमुख
वसई – विजय पाटील
कांदिवली पूर्व – काळू बढेलिया
चारकोप – यशवंत सिंग
सायन कोळीवाडा – गणेश कुमार यादव
श्रीरामपूर – हेमंत ओगळे
निलंगा – अभयकुमार साळुंखे
शिरोळ – गणपतराव पाटील













































































