जयंत पाटील यांना घेरण्यासाठी महायुतीचं जोरदार प्लॅनिंग सुरु
सांगली । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना घेरण्यासाठी पहिला मोठा डाव टाकला आहे. राष्ट्रवादीकडून निशिकांत भोसले-पाटील यांची उमेदवारी जाहीर करून जयंत पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार दिला आहे. जयंत पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघात घेरण्यासाठी महायुतीनं जोरदार प्लॅनिंग सुरु आहे.
विधानसभेच्या गेल्या सलग सात निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विजय मिळवला आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये विरोधकांमध्ये झालेल्या दुफळीचा मोठा फायदा जयंत पाटील यांना झाला आहे. तिरंगी – चौरंगी लढतीमुळे या निवडणुकांत जयंत पाटील यांचा सहज विजय झाला होता. गत निवडणुकीत निशिकांत भोसले-पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना चांगली लढत दिली होती. विरोधकांपैकी कोणीही बाजूला नसताना त्यांनी एकहाती ४० हजाराहून अधिक मते घेतली होती. तर शिवसेनेकडून गौरव नायकवडी यांना उमेदवारी मिळाली होती. पक्षाची अधिकृत उमेदवारी असल्याने त्यांना ३५ हजाराहून अधिक मते मिळाली होती. विरोधकांमधील दुफळीचा मोठा फायदा त्यावेळी आ. पाटील यांना झाला होता.
अजित पवारांनी इस्लामपूरमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना घेरण्यासाठी मोठा डाव टाकला आहे. अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात निशिकांत भोसले-पाटील यांना उमेदवारी दिली आहे. आमदार जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात मागील काही वर्षापासून राजकीय वर्चस्वावरून मतभेद आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी इस्लामपूरच्या जागेसाठी आग्रह धरला होता.
निशिकांत भोसले-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीकडून ते निवडणूक रिंगणात असणार आहेत. त्यामुळे त्यांना महायुतीतील घटक पक्षांचे पाठबळ मिळणार आहे.त्यातच मुंबईत आज अजित पवार यांच्या उपस्थितीत निशिकांत भोसले-पाटील यांच्या झालेल्या प्रवेश कार्यक्रमाच्यावेळी आ. सदाभाऊ खोत यांची असलेली उपस्थिती बरंच काही सांगून जाते. महाडिक गट, नायकवडी गट या मतदार संघातील मात्तबरांची ताकद मिळणे हे निशिकांत भोसले-पाटील यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यांना विरोधकांची मोट बांधावी लागणार आहे. माजी राजू शेट्टी यांचीही भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.
पक्षाची अधिकृत ताकद असल्याशिवाय उमेदवाराला लढायला बळ मिळत नाही. त्यामुळे अन्य उमेदवारांना त्याचा फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या निवडणुकीत जयंत पाटील आणि निशिकांत भोसले-पाटील असा थेट सामना रंगणार आहे. अजित पवार यांनी इस्लामपूरची जागा राष्ट्रवादीकडे घेतल्याने त्यांचेही या मतदारसंघाकडे विशेष लक्ष असणार आहे. एकूणच ही निवडणूक अभूतपूर्व चुरशीने होणार असे दिसते.