Last Updated on 06 Feb 2024 4:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे | राज्यातील बहुप्रतीक्षेत असणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या एकूण 21 हजार 678 रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे.त्यानुसार,अखेर मुलाखतीशिवाय 16 हजार 799 आणि मुलाखतीसह 4 हजार 879 पदांची भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे.याबाबतची माहिती शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली आहे.
या भरती अंतर्गत एकूण 21 हजार 678 रिक्त पदे भरली जाणार आहेत.ज्यात खासगी अनुदानित, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद शाळांचा समावेश असणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये पहिली ते बारावी पर्यंतच्या रिक्त शिक्षक पदांची भरती करण्यात येणार आहे.यावेळी 80 टक्के जागांसाठी ही शिक्षक भरती करण्यात येणार आहे.जून ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये शिक्षक पदांसाठीच्या बिंदूनामावली करण्यात आली होती. मात्र बिंदू नामावलीसंदर्भात विधीमंडळात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आल्यामुळे जिल्हा परिषदांच्या 10 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये 70 टक्के पदांसाठी शिक्षक भरती करण्यात येणार आहे.पवित्र संकेतस्थळावर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शिक्षक भरती प्रक्रियाअंतर्गत 34 जिल्हा परिषद 12 हजार 522 पदे, 18 महापालिका 2 हजार 951 पदे, नगरपालिका 477, नगरपरिषदांतील 1 हजार 123, खासगी अनुदानित 5 हजार 728 पदे भरली जाणार आहेत.यामध्ये मुलाखतीशिवाय 16 हजार 799 पदे भरण्यात येतील.तर मुलाखत घेऊन 4 हजार 879 पदे भरली जातील. सर्व उमेदवारांना पसंती क्रम नमूद करण्याची सुविधा येत्या आठ फेब्रुवारीपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. सर्व इच्छुक उमेदवारांना 9 फेब्रुवारीपर्यंत पदनिहाय पसंतीक्रम नमूद करणे अनिवार्य असेल.पुढे या पदाभरतीसाठी उमेदवारांच्या प्राधान्य क्रमाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
माध्यमनिहाय जागांचा विचार केला तर सर्वाधिक पदे मराठी माध्यमातील शाळांमध्ये भरली जाणार असल्याचे दिसून येत आहे. एकूण भरतीतील पदांपैकी मराठी मध्यमासाठी 18 हजार 373 पदे भरली जाणार आहेत, इंग्रजी माध्यमातील 931, उर्दूसाठी 1 हजार 850, हिंदीसाठी 410, गुजरातीसाठी 12, कन्नडसाठी 88, तमीळसाठी 8, बंगालीसाठी 4 आणि तेलुगू माध्यमासाठी 2 जागा उपलब्ध आहेत.
शिक्षक भरतीच्या रिक्त जागांचा तपशील
संस्था: संस्थांची संख्या : शिक्षकांची रिक्त पदे
जिल्हा परिषद : 34 : 12522
महानगरपालिका : 18 : 2951
नगरपालिका : 82 : 477
खासगी शैक्षणिक संस्था : 1123 : 5728













































































