Last Updated on 12 Sep 2024 9:36 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कृष्णा नदीकाठच्या काही गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून रात्रीच्या सुमारास होत असलेल्या ड्रोनच्या घिरट्यांमुळे लोकांची झोप उडाली आहे.त्यातच मंगळवारी रात्री 12 ते 2 च्या सुमारास बहे, फार्णेवाडी गावावर एकाचवेळी चार ड्रोनने घिरट्या घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या ड्रोनचे नेमके गौडबंगाल काय अशी चर्चा कृष्णाकाठाला आहे. घिरट्या घालणाऱ्या ‘ड्रोन’ची दहशत मात्र कायम आहे. ड्रोनच्या घिरट्यांनी अफवांचे पेव फुटल्याने नागरिक रात्री जागून काढताना दिसत आहेत.
कृष्णा नदीकाठच्या बहे, फार्णेवाडी, शिरटे तसेच अन्य गावात गेल्या पंधरा दिवसांपासून रात्रीच्या सुमारास ड्रोनच्या घिरट्या वाढल्या आहेत. मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास फार्णेवाडी येथे तीन ड्रोन लोकांना घिरट्या घालताना दिसले. रात्री 12.30 च्या सुमारास साखराळे परिसरात युवकांना ड्रोन घिरट्या घालताना दिसले. या युवकांनी ड्रोनचा पाठलागही केला. तर रात्री 1.45 च्या सुमारास बहे येथे घरांवरून एकाचवेळी चार ड्रोन घिरट्या घालताना दिसले.
तालुक्यांतील कृष्णाकाठच्या गावांत गेल्या पंधरा दिवसांपासून रात्री ड्रोन फिरत आहेत. त्यामुळे भीती निर्माण झाली आहे. ड्रोनचे अनेक फोटो-व्हिडिओ नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केले आहेत. रात्रीच्या अंधारात अवकाशात काही उंचीवर ड्रोन घिरट्या घालतांना अनेकांनी पाहिले आहे. काही ठिकाणी तरुणांनी गस्त सुरू केली आहे. तर काही ग्रामपंचायती अजूनही सुस्तच आहेत.पत्रके काढण्यापलीकडे त्यांची हालचाल दिसून येत नाही.

केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन देणार; PM किसान मानधन योजना नेमकी काय?
मोदी सरकारचा मोठा निर्णय! आता 70 वर्षावरील वयोवृद्धांना मिळणार मोफत उपचार
5 वर्षात सुमारे 5 हजार सायबर कमांडो तयार होणार …सायबर गुन्हे रोखण्यासाठी उपक्रम
रामलिंग बेटावरचे पुरातन मारुती मंदिर…या मंदिराची देशभरात ख्याती!
चोरट्यांच्या टोळ्यांकडुन चोरी करण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जात असल्याच्या चर्चा देखील ग्रामीण भागात रंगू लागल्या आहेत. परिसरात ड्रोन फिरत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. हे ड्रोन कुठून येतात आणि कुठे गायब होतात, हे समजत नाही. ड्रोनचा कोणताही शोध लागत नसल्याने हे रात्री उडणारे ड्रोन नागरिकांची आणि पोलिसांची डोकेदुखी बनली आहे. हे ड्रोन नेमका कोण व कशासाठी उडवत आहे, याच्या साहाय्याने हेरगिरी करून परिसरात चोऱ्या तर होत नाही, असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होऊ लागले आहेत. रात्री फिरणाऱ्या ड्रोनचा शोध घ्यावा, अशी मागणी आता नागरिक करत होते.
ड्रोनच्या या सततच्या घिरटयांनी कृष्णाकाठच्या लोकांची झोप उडवली आहे. शासकीय यंत्रणांनाही हे ड्रोन नेमके कोणाचे याचा अंदाज येईना झाला आहे. त्यातच रात्रीचे चोरी, चोरीचे प्रयत्न तसेच रात्रीच्यावेळी चोर दिसत असल्याच्या चर्चा आणि महत्वाचे म्हणजे मोठयाप्रमाणात सुरु असलेल्या अफवा यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. संबंधित विभागातील शासकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ काळजी घेत याकडे लक्ष देऊन जनतेला या बाबत प्रबोधन करुन भिती दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.










































































