प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेले बहे (ता. वाळवा) येथील श्री क्षेत्र रामलिंग बेट हे प्राचीन तीर्थक्षेत्र ! समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या ११ मारुती मंदिरांपैकी एक मारुती मंदिर याच बेटावर आहे.सांगली,सातारा जिल्ह्याला वरदान ठरलेली जीवनदायिनी कृष्णामाईच्या तीरावर बहे गावच्या पश्चिमेस असणारे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून रामलिंग बेटाचा उल्लेख रामायण काळापासून केला जातो.
या गावाला येथील रामलिंग बेटामुळे प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे.इस्लामपूर पासून १० कि.मी. व कृष्णा कारखान्यापासून सुमारे ७ कि. मी.अंतरावर कृष्णेच्या तीरावर हे बेट वसलेले आहे.
रामलिंग बेटावरील मारुतीच्या स्थापनेविषयी आख्यायिका सांगितल्या जातात.एका कथेचा उल्लेख सापडतो.एक आख्यायिका अशी,प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रामलिंग बेटावर समर्थ रामदास एकदा या तीर्थाच्या दर्शनासाठी आले.प्रभू श्रीराम,लक्ष्मणाचे दर्शन त्यांना झाले.पण हनुमान कुठे दिसेनात,तेव्हा समर्थांनी गावकऱ्यांना विचारले,”येथे मारुती का नाही?” तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले,”यवनांच्या भयास्तव मारुतीची मूर्ती आमच्या पूर्वजांनी भीमकुंडात टाकली आहे.”तेव्हा समर्थांनी हाक दिली,याविषयी समर्थांनी एका अष्टकात म्हटले आहे –
हनुमंत पाहावयालागी आलो,दिसेना सखा थोर विस्मीत जालो। तयावीण देवालये ती उदासे,जळातूनी बोभाइला दास दासे ।।
त्यानंतर समर्थांनी गावकऱ्यांना ११ खंडीचा नैवेद्य तयार करावयास सांगितले व डोहात बुडी मारून मारुतीची ११ गज उंचीची सुवर्णमूर्ती वर काढली.ते ११ प्रहर आत होते.मूर्ती पाण्यातून वर आणल्यानंतर मूर्तीला दाखवण्यासाठी गावकऱ्यांनी ११ खंडीचा नैवेद्य तयार केला नव्हता.मारुती ताटकळणार कसे? म्हणून ते गुप्त झाले.पुढे मारुतीचे दैवी रूप आठवून समर्थांनी डोहात बुडी मारून तिथून मारुतीची मूर्ती बाहेर काढली आणि बहे इथे रामलिंग बेटावर तिची स्थापना केली.हा मारुती रामलिंग मंदिराच्या मागील बाजूस आहे.यालाच भव्य ‘वीर बाहू हनुमान’, मारुती किंवा विक्राळ मारुती असेही म्हणतात.ही मूर्ती भीमरूपी असून फार सुंदर आहे.रेखीय अवयव,तेजस्वी व सुहास्य वदन,समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी हा मारुती सर्वात मोठा व भव्य ‘वीर बाहू हनुमान’ आहे असे म्हटले जाते.समर्थांना मारुतीचे प्रत्यक्ष दर्शन बहे येथे घडले म्हणून त्यांनी १ भीमरूपी स्तोत्र या स्थानास अनुकूलन केले आहे.
अनेक थोर संत,महात्मे,वारकरी व अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बेटाचा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची कल्पना आ.जयंत पाटील यांच्या दूरदृष्टीतून साकारली आणि आज या बेटाचे स्वरूप बदलले आहे.मंदिर परिसर,तटबंदी,मुख्य दरवाजा,पुजारी निवास,अंतर्गत रस्ते,बागबगीचा,नदी पात्रातील रस्ता अशी पर्यटनासाठी आवश्यक असलेली कामे लोकांच्या आग्रहास्तव राज्य शासनामार्फत पूर्ण झालेली आहेत.काही नियोजित कामे लवकरच मार्गस्थ होणार आहेत.
रामलिंग बेटावर कसे याल ?
इस्लामपूर मार्गे बहे ते रामलिंग बेट.
कोल्हापूर मार्गे येवलेवाडी ते दंड भाग व रामलिंग बेट.
कराड मार्गे रेठरे कारखाना, नरसिंहपूर ते रामलिंग बेट.