Last Updated on 14 Jan 2024 1:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दहिसर (पूर्व) च्या शिववल्लभ क्रॉस रोड येथे स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला.यावेळी मुख्यमंत्र्यांनी शालेय विद्यार्थी,स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
प्रदूषणमुक्त मुंबईसाठी सुरु असलेल्या स्वच्छता मोहिमेत रस्ते धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात नाही असे स्पष्ट करुन रस्ते, सार्वजनिक शौचालये, गटारी, नियमितपणे स्वच्छ करण्याच्या आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. रस्ते, पदपथांची दुरुस्ती,सुशोभिकरणाबरोबरच ‘अर्बन फॉरेस्ट’ ची संकल्पना राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
सखोल स्वच्छता अभियान आता राज्यभर राबविण्यात येत असून स्वच्छ सर्वेक्षणाचा केंद्र सरकारचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाल्याचे सांगून स्वच्छता अभियान ही निरंतर, सतत चालणारी प्रक्रिया आहे.महापालिका, स्वयंसेवी, सहकारी संस्था, सामान्य नागरिक मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आता राज्यातील सगळी मंदिरे आणि परिसरात स्वच्छता अभियान सुरु करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि मंदिर-परिसराची स्वच्छता केली.
दहिसर (पूर्व) येथील आजी-आजोबा उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आयोजित बालचित्रकला स्पर्धेच्या या उद्यानातील केंद्रावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भेट देऊन चिमुकले रेखाटत असलेल्या चित्रांची पाहणी केली. जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
आमदार प्रकाश सुर्वे, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.












































































