Last Updated on 02 Jul 2026 7:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
कृष्णा व राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने सातत्याने हातात-हात घालून कृष्णा नदीकाठचा शेतकरी व साखर कामगारांचे हित साधले आहे. लोकनेते राजारामबापू पाटील, सहकार महर्षी जयवंतराव भोसले, स्व.यशवंतराव मोहिते यांनी उभा केलेली साखर कारखानदारी टिकविणे,वाढविण्याची जबाबदारी आपणा सर्वांच्यावर आहे. आपण त्यादृष्टीने काम करूया,असा विश्वास यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी राजारामनगर येथे बोलताना व्यक्त केला.
तत्पूर्वी डॉ.सुरेश भोसले (बाबा) यांनी कृष्णा साखर कारखान्याचे वाळवा तालुक्यातील नूतन संचालक व राजाराम बापू उद्योग समूहातील पदाधिकाऱ्यांच्या समवेत राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर स्व.बापूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते डॉ.सुरेश भोसले (बाबा) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नूतन संचालक लिंबाजी पाटील (तांबवे),संभाजी पाटील (नेर्ले),अँड.संग्राम पाटील (येडेमच्छिंद्र), जे.डी.मोरे (रेठरे हरणाक्ष), सुनिल पाटील (कामेरी), तसेच दयानंद पाटील (काले) यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील, महाराष्ट्र केसरी पै.आप्पासाहेब कदम, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील ,बाजार समितीचे सभापती डॉ.अशोक पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, आपल्या परिसरात सहकारी साखर कारखानदारी आणि ऊस पिका तून समृद्धी आली,हे कोणीही नाकारू शकत नाही. मात्र सध्या सगळेच साखर कारखाने अडचणीत आहेत. सरकार एका बाजूला एफआर पी वाढवित आहे, मात्र त्याच वेळी साखर विक्रीचा दरही वाढवायला हवा. लोकांचा शेती करण्यातील रस संपत चालला आहे. आता केवळ ऊस तोडून आणतोय,मात्र भविष्यात ऊस शेती करून ऊस आणावा लागेल. अनेक नव-नवीन आव्हाने उभा आहेत, त्यांना एका विचाराने व ताकदीने सामोरे जावे लागेल.
देवराज पाटील म्हणाले,राजारामबापू व कृष्णा या दोन्ही साखर कारखान्यांनी आ.जयंतराव पाटील,डॉ.सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने या परिसरातील शेतकरी व कामगारांचे प्रश्न सोडविले आहेत. राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील हे शेतकऱ्यांच्या बांधावर अद्यावत तंत्रज्ञान पोचवीत एकरी उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. दोन्ही समूह हातात-हात घालून पुढे जातील.
याप्रसंगी राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पवार, विठ्ठल पाटील, दिलीपराव देसाई, दादासाहेब मोरे, शैलेश पाटील, अतुल पाटील, राजकुमार कांबळे, रघुनाथ जाधव, अमरसिंह साळुंखे, कृष्णेचे माजी संचालक संजय पाटील, ब्रम्हानंद पाटील, एम.के.कापूरकर, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख, कारखान्याचे सचिव डी.एम.पाटील, लेबर ऑफिसर महेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.













































































