Last Updated on 02 Jul 2026 3:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीसाठी आवश्यक असलेल्या अर्हता निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, त्यानंतर भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.
विधानपरिषदेत सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी उपस्थित केलेल्या सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते. चर्चेमध्ये सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे , जयंत आसगावकर, सुधाकर अडबाले, अभिजीत वंजारी, धीरज लिंगाडे यांनी सहभाग घेतला.
राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, कोविड-१९ काळात कर्मचाऱ्यांच्या नियुक्तींवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने संबंधित निर्णय रद्द केल्यानंतर सुधारित आकृतिबंध व विहित कार्यपद्धतीनुसार पुढील कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या अटी) नियमावली, १९८१ मधील अनुसूची ‘ब’च्या नोंद क्रमांक ४ अंतर्गत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीसाठी आवश्यक अहर्ता निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर तब्बल ४५ वर्षांचा कालावधी लोटल्याने बदलत्या गरजांनुसार त्यात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यानुसार नवीन अहर्ता निश्चित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, शिक्षकेतर पदभरतीचा एकत्रित आढावा घेऊन भरती प्रक्रिया लवकर सुरू करण्याचे नियोजन असल्याचे राज्यमंत्रीडॉ. भोयर यांनी स्पष्ट केले.
उपप्रश्नाला उत्तर देताना डॉ. भोयर म्हणाले की, विहित कार्यपद्धतीनुसार झालेल्या नियुक्त्यांना सर्व अटी व शर्तींच्या अधीन राहून मान्यता दिली जाईल. तसेच संचमान्यता अंतिम झाल्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी देण्याची कार्यवाहीही सुरू आहे. अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांबाबतही आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.













































































