Last Updated on 25 Nov 2024 10:25 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांचा निसटता विजय झाला. निशिकांत भोसले-पाटील यांनी कडवी झुंज दिली. पण, तालुक्यात जयंत पाटील यांच्या विजयापेक्षा निशिकांत भोसले-पाटील यांनी त्यांना चांगलेच झुंजवल्याची चर्चा अधिक आहे. त्यातच, तालुक्यातील स्वाभिमानी जनतेच्या मनातील आमदार …’वाघ पुन्हा येतोय’ असा आशय असलेलं डिजीटल पोस्टर सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. साखराळे येथील येथील युवाशक्तीने लावलेले हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
इस्लामपूर मतदार संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच अत्यंत चुरशीने निवडणूक झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील व महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्यात थेट सामना झाला. एकास- एक लढत, विरोधकांची एकी, ऊसबिल न मिळाल्याने व इतर कारखान्याच्या तुलनेतील दरातील दरी यावरुन शेतकऱ्यांची असलेली मोठी नाराजी यामुळे शेवटी ही निवडणूक अत्यंत चुरशीच्या टप्प्यावर पोहचली. सुरवातीपासूनच या मतदारसंघात ‘अंडर करंट’ होता. ऊस दर, ऊस बील, बेरोजगारी आदी मुद्दे प्रभावी ठरले. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आठव्यांदा जिंकले खरे, पण मताधिक्य कमालीचे घटले.
हेही वाचा – इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांचा निसटता विजय, निशिकांत भोसले-पाटील यांची निकराची झुंज
राज्यात महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज पराभूत झाले असताना जयंत पाटील हे आठव्यांदा विजयी झाले, हीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. पण अवघ्या १३ हजारावर आलेले मताधिक्य त्यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजवणारी आहे. गेल्या सात निवडणुकांत निर्विवाद वर्चस्व राखलेल्या बालेकिल्ल्याची पडझड झाली आहे. त्यातच राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्याने डागडुजी करताना, जयंत पाटील यांना कसरत करावी लागणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पक्षाची कसोटी लागणार आहे. महायुतीचे निशिकांत भोसले-पाटील यांना व त्यांच्या समर्थकांना निसटत्या पराभवाचे शल्य राहणार आहे. पण पुन्हा ताकदीने लढण्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा हा पराभव आहे. आष्टा व इस्लामपूर नगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा एकदा सर्व विरोधक जयंत पाटील यांना नडणार आहेत.
निशिकांत भोसले-पाटील समर्थक पुन्हा एकदा कामाला लागल्याचे दिसत आहे. आष्टा व इस्लामपूर नगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबरोबरच २०२९ च्या विधानसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरु केली आहे. तालुक्यातील स्वाभिमानी जनतेच्या मनातील आमदार …’वाघ पुन्हा येतोय’ असा आशय असलेलं डिजीटल पोस्टर सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. साखराळे येथील युवाशक्तीने लावलेले हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, यापुढील काळात या मतदारसंघात दोन्ही गटात मोठा संघर्ष दिसून येणार आहे.












































































