Last Updated on 23 Nov 2024 9:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर मतदार संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत अखेर जयंत पाटील यांचा निसटता विजय झाला. त्यांना अवघे १३ हजार २७ चे मताधिक्य मिळाले. राष्ट्रवादीचे निशिकांत भोसले- पाटील यांनी त्यांना निकराची झुंज दिली. त्यांना तब्बल ९६ हजाराहून अधिक मते पडली. या मतदारसंघातून जयंत पाटील यांनी सलग आठव्यांदा विजय मिळवला आहे. विरोधकांना मिळालेली मते उत्साहवर्धक आहेत. तर जयंत पाटील यांना आत्मपरिक्षण करायला लावणारी आहेत. यावेळी त्यांचे मताधिक्य घटले आहे.
इस्लामपूर शहराने जयंत पाटील यांना साथ दिली. मात्र आष्टा शहरासह कृष्णाकाठावर त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. तर निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या अनेक गावात आघाडी घेतली. मिरज तालुक्यातीलव ८ गावांनी त्यांना अडीच हजारांचे मताधिक्य दिले. जयंत पाटील यांना पोस्टल मतासह १ लाख ९ हजार ८७९ तर निशिकांत पाटील यांना ९६ हजार ८५२ मते मिळाली.नोटाला १ हजार २१ मते मिळाली.166 पोस्टल मते बाद झाली. अन्य उमेदवारांना मिळून ४ हजार ६३३ मते मिळाली. जयंत पाटील यांना पोस्टल मते १ हजार ८३१ तर निशिकांत पाटील यांना ७१५ मते मिळाली. जयंत पाटील यांचा १३ हजार २७ मतांनी निसटता विजय झाला.
सकाळी ८ वाजता इस्लामपूर येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणीला सुरूवात झाली. इस्लामपूर शहरात जयंत पाटील यांना ७ हजारच्या पुढे आघाडी मिळाली तर आष्टा शहरात केवळ 83 मते जादा मिळाली. आष्टा येथून जयंत पाटील यांना मिळालेले हे अल्प मताधिक्य सत्तारुढांना धक्कादायक आहे.
महायुतीतून माजी मंत्री सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, गौरव नायकवडी, आनंदराव पवार असे सर्व घटक पक्ष एकत्र आल्याने जयंत पाटील यांचे मताधिक्य कमालीचे कमी झाले.
इस्लामपूर मतदार संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच अत्यंत चुरशीने निवडणूक झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील व महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्यात थेट सामना झाला. एकास- एक लढत, विरोधकांची एकी, ऊसबिल न मिळाल्याने व इतर कारखान्याच्या तुलनेतील दरातील दरी यावरुन शेतकऱ्यांची असलेली मोठी नाराजी यामुळे शेवटी ही निवडणूक अत्यंत चुरशीच्या टप्प्यावर पोहचली. सुरवातीपासूनच या मतदारसंघात ‘अंडर करंट’ होता. ऊस दर, ऊस बील, बेरोजगारी आदी मुद्दे प्रभावी ठरले आहेत.
जयंत पाटील यांनी सुरवातीच्या १९९० च्या निवडणुकीच्या अपवाद वगळता सर्व सात निवडणुकांत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. निवडणूक जाहीर होण्याआधी ही निवडणूकही एकतर्फी होईल असा जयंत पाटील समर्थकांना आत्मविश्वास होता. गत निवडणुकांप्रमाणेच यावेळीही तिरंगी लढत होईल अशी अपेक्षा आणि चर्चा होती. पण, प्रत्यक्षात जयंत पाटील व महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्यात थेट सामना झाला. निशिकांत भोसले-पाटील यांच्या समर्थकांनी मतदारसंघात शांतपणे प्रचार करत आपले मुद्दे लोकांना पटवून दिले. जयंत पाटील यांना अवघे १३ हजार २७ मतांचे मताधिक्य मिळाले.
इस्लामपूर विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी मोर्चेबांधणी केली होती. भाजपातील निशिकांत पाटील यांना उमेदवारी देऊन दोन मोठ्या प्रचारसभा घेतल्या होत्या. तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचारसभांसाठी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला होता. मतदारसंघात पाटील यांचा प्रचार त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता, जयंत पाटील यांच्यावर ऊसाच्या मुद्द्यावरुन टीका केल्या होत्या. या मतदारसंघात ऊस दराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता.

इस्लामपूरचा अधिकृत निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा – इस्लामपूर विधानसभा
जनतेचा निर्णय मान्य; यापुढील आयुष्य जनतेच्या सेवेसाठी : निशिकांत भोसले-पाटील
इस्लामपूर विधानसभा मतदार संघामध्ये झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिवर्तनासाठी प्रामाणिकपणे कष्ट घेतले. मी गेल्या पाच वर्षापासून अखंड मतदारांच्या सेवेत राहिलो. झालेल्या निसटत्या पराभवावर चिंतन करुन यापुढे तेवढ्याच ऊर्जेने व सेवाभावनेतून सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. कार्यकर्त्यांनी खचुन न जाता पुन्हा तेवढ्याच चांगल्या विचाराने हातात हात घालून सर्वाना बरोबर घेऊन मतदार संघाच्या विकासासाठी, जनतेच्या न्याय, हक्कासाठी आपण लढत राहाणार आहोत. या निवडणूकीत मतदार बंधु,भगिनी यांनी मतदानाच्या माध्यमातुन दिलेला निर्णय मान्य असून यापुढील माझे आयुष्य आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल, महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनींचे मनपुर्वक आभार.
निशिकांत प्रकाश भोसले-पाटील












































































