Last Updated on 24 Oct 2024 8:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । आपणास हे राज्य सरकार उखडून फेकायचे आहे आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणून नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. माझा आपणा सर्वांवर प्रचंड विश्वास आहे. आपण जीवाची बाजी लावून मोठा विजय खेचून आणाल,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथील महाविकास आघाडी च्या विराट सभेत बोलताना व्यक्त केला. तत्पूर्वी न भूतो न भविष्यती असे इस्लामपुरात असे शक्तीप्रदर्शन करत शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. यानंतर आ.पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
इस्लामपूर येथील गांधी चौकातील या विराट सभेस माजी मंत्री शिवाजीराव नाईक,प्रा.लक्ष्मण ढोबळे,आ.मानसिंगराव नाईक,आ.अरुण अण्णा लाड,विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील,राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील,दिलीपराव पाटील,माणिकराव पाटील,युवा नेते प्रतिक पाटील,राजवर्धन पाटील,डीपीआयचे संस्थापक प्रा.सुकुमार पाटील,प्रसिध्द वक्ते यशवंत गोसावी,प्रा.शामराव पाटील,नेताजीराव पाटील,काँग्रेसचे बाळासाहेब पाटील,राजेंद्र शिंदे,ॲड.आर.आर.पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,अविनाश पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,आष्टयाचे वैभव शिंदे,ॲड.चिमण डांगे,शहराध्यक्ष शहाजी पाटील,खंडेराव जाधव,ॲड.धैर्यशिल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी,काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे नेते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी भाजपाचे नेते,सर्वोदयचे माजी उपाध्यक्ष महावीर चव्हाण (समडोळी), चर्मकार समाजाचे नेते आदिनाथ चौधरी, माजी नगरसेविका सुमन चौधरी यांनी पक्ष प्रवेश केला.

आ.पाटील म्हणाले,तुमच्या ताकदीवर मी संपूर्ण राज्यात फिरतोय. आपण आपले गांव,आपला बूथ सांभाळा आणि तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह तळागाळापर्यंत पोचवा. या निवडणुकीत तुम्हास सर्व प्रकार पहायला मिळतील. विरोधक नांव व चिन्ह साधर्म्य असणारे उमेदवार उभा करतील. राज्यातून,देशातून नेते इथे येऊन आरोप करतील. अफवा पसरविल्या जातील आणि शेवटच्या चार दिवसात मतासाठी वाटेल ती किंमत मोजतील. तुम्ही विचलित होऊ नका. विरोधकांना काय बोलायचे ते बोलू द्या. मी फारसे बोलणार नाही. १०० पैकी ७० मते आपली असतील,तर त्यांच्यावर कशाला बोला. सत्तेत जाऊन बसणे सोपे होते. मात्र आपण वाळव्याचा स्वाभिमान कायम ठेवला. ब्रिटिशासारख्या बलाढ्य शत्रूच्या विरोधात लढण्याची आपली परंपरा आहे. भीती दाखविणाऱ्याच्या पुढे हा तालुका कदापी झुकणारा नाही. माझा इथं पर्यंतचा प्रवास लहान मोठे कार्यकर्ते आणि जनतेच्या जीवावर झाला आहे,याची मला पूर्ण जाणीव आहे. आपण निष्ठावंत कार्यकर्त्याप्रमाणे बाहेरच्या पक्षातून आलेल्या नेत्यांनाही उमेदवारी दिली आहे. राजकारणात संख्येला महत्व असते. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चांगल्या संख्येने निवडून येतील.

दिलीपराव पाटील म्हणाले,अजित पवार यांच्यासारखी रक्ताची माणसं पवार साहेबांना सोडून गेली. मात्र जयंतराव पाटील या निष्ठावंत सेनापतीने पवारसाहेबांना भक्कम साथ दिली. आ.जयंतराव पाटील यांनी अखंड तालुका घडविला असून त्यांच्या शी कोणी प्रतारणा करू शकत नाही. आपल्या प्रत्येक घासात बापू आणि जयंतराव आहेत. जे विरोधी बोलतात,त्यांच्या शेतात लव्हाळा उगवत होता. मग इतका विकास कोणामुळे झाला?
प्रसिध्द वक्ते यशवंत गोसावी म्हणाले, राज्यात इतर मतदारसंघात पाणी,वीज, शिक्षण,साखर कारखाना,विकास कामांवर निवडणूका लढविल्या जात आहेत. आ. जयंतराव पाटील यांनी गेल्या ३५ वर्षात ही विकासकामे करून माणूस घडविला आहे. हा मतदार राज्याच्या मुख्यमंत्रीपदास मतदान करणार आहे. कोणीतरी कॉलेजचे नांव बदलले. मात्र हे कॉलेज कोणामुळे उभा राहिले,हे जनता विसरणार नाही.
माजी राज्यमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे म्हणाले, जयंतराव पाटील म्हणजे राज्यातील एक संयमी,कर्तृत्ववान व निष्कलंक नेते आहेत. ते उद्याचे राज्याचे नेतृत्व करणार आहेत.
डीपीआयचे संस्थापक प्रा.सुकुमार कांबळे म्हणाले,जयंतराव पाटील हे राज्याचे मुख्य मंत्री होणार आहेत. त्यांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी करा.

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील म्हणाले,आपल्यात काही मतभेद असतील,तर ते चर्चेने सोडवू. आता रुसवे- फुगवे बाजूला ठेवून सर्वांनी कामाला लागावे.
माजी नगराध्यक्ष ॲड.चिमण डांगे म्हणाले,कोणीतरी म्हणते आमदारांनी ३५ वर्षात काय केले? तालुक्याचे राहू द्या,तुमचा विकास कोणामुळे झाला? तुमच्या कॉलेजच्या परवानगीसाठी नाशिक,दिल्लीस कोण आले. ज्यांनी नगराध्यक्ष म्हणून शहराच्या वैभवात भर घालणारे एकही काम केले नाही,त्यांना साहेबांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही
वैभव शिंदे यांनी आष्टा शहरातून आम्ही १० हजारच्यावर मताधिक्य देऊ अशी ग्वाही दिली.

यावेळी शहराध्यक्ष शहाजी पाटील,माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील,महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने,खंडेरावनाना जाधव, ॲड.धैर्यशिल पाटील,अरुण कांबळे,काँग्रेसचे ॲड.आर.आर.पाटील,युवा उद्योजक रविंद्र माणगावे,शिवाजी चोरमुले (आष्टा),ॲड.सुधीर मोरे,कु.ऋतुजा माने यांनी आ.पाटील यांना लाखाच्यावर मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार बोलून दाखविला.
प्रारंभी तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विनायक पाटील,बाळासाहेब पाटील, बी.के. पाटील, रविंद्र बर्डे, भिमराव पाटील,सुधाकर वायदंडे, शंकर महापुरे,संजय बजाज,राहुल पवार, मैनुद्दीन बागवान,दादासाहेब पाटील,विश्वनाथ डांगे,सुभाषराव सुर्यवंशी,झुंझारराव पाटील, संग्राम जाधव,देवराज देशमुख,भास्कर पाटील,वैभव पाटील,भरत देशमुख,रोझा किणीकर,पुष्पलता खरात,पिरअली पुणेकर, शंकरराव चव्हाण,दिग्विजय पाटील यांच्यासह तिन्ही पक्षाचे स्त्री-पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान सकाळी पंचायत समितीपासून अलोट गर्दीच्या सहभागाने रॅलीस सुरुवात झाली. फुलांनी सजविलेल्या उघड्या जीपमध्ये आ.पाटील,त्यांचे सुपुत्र प्रतिकदादा पाटील,राजवर्धन पाटील (भैय्या) यांनी उभा राहून लोकांना अभिवादन केले. जागोजागी महिलांनी त्यांचे औक्षण केले,युवकांनी पुष्पवृष्टी केली. झरी नाका,आझाद चौक, गणेश मंडई,कापुसखेड नाका,यल्लामा चौका तून गांधी चौकात रॅली आली. येथे रॅलीचे सभेत रूपांतर झाले.
मुसळधार पाऊस आणि कडाक्याचे ऊन
गेल्या आठवड्यात इस्लामपूर येथे शिव स्वराज्य यात्रेची सांगता सभा झाली. या सभेपुर्वी मुसळधार पाऊस पडला. मात्र लोक हालले नाहीत. जोरदार सभा झाली. आज दिवसभर कडक ऊन असताना लोक रॅली, आणि जाहीर सभेस मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी झाले होते. यामध्ये महिला व युवकांची संख्या लक्षणीय होती. लोकांनी नेत्यावर कसे प्रेम असते,हे दाखवून दिले.













































































