Last Updated on 30 Aug 2023 10:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या एस. डी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी उरून इस्लामपुर या महाविद्यालयास यंदाच्या 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने बी. फार्मसी हा नविन अभ्यासक्रम सुरु करण्यास नुकतीच मान्यता दिली, अशी माहिती संस्थेचे सहसचिव ॲड.धैर्यशील पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
ॲड.धैर्यशील पाटील म्हणाले,खासदार एस. डी. पाटील यांनी स्थापन केलेल्या वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या पूर्व प्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक ते व्यावसाईक शिक्षणातील विविध स्तरावर या जिल्हयांमध्ये विविध प्रकारच्या शाखांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.यामध्ये उच्च शिक्षण स्तरावर कला,वाणिज्य,विज्ञान,बीबीए,बीसीए,बीएससी,बीसीएस,एम कॉम,डिप्लोमा इन टॅक्सेशन,बीएड,आर्किटेक्चर,डी फार्मसी अशा विविध शाखांबरोबरच आता औषध निर्मिती शास्त्रातील बी. फार्म. हा कोर्स सुरू करण्यास मान्यता मिळाली.त्यामुळे संस्थेमध्ये देखील नव्या शाखेची भर पडली आहे.
सध्या फार्मसी क्षेत्राशी संबंधित विविध व्यवसायांना तसेच स्वयंरोजगाराच्या दृष्टीने देखील विद्यार्थ्याकडून या शिक्षणाची मागणी वाढल्याने आणि रोजगाराच्या विविध संधी देखील या शिक्षणामुळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्याने संस्थेने हा कोर्स सुरू करण्याचे ठरविले. त्याला आता मान्यता मिळाली असून बी. फार्मसी साठी 60 जागांची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र तंत्र शिक्षण संचालनालयाच्या नियमानुसार शासनाच्या सीईटी गुणवत्ता यादीनुसार सुरु होणार आहे.
हेही वाचा – दहावी व बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 चे संभाव्य वेळापत्रक जाहीर
या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी दिनांक 30 ऑगस्ट ते १ सप्टेंबर 2023 ला सुरू होत आहे.बी फार्मसी हा अभ्यासक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे (रायगड) या विद्यापीठाची संलग्न आहे.एस. डी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पदवीका अभ्यासक्रम म्हणजे डी फार्म या संस्थेमध्ये सन 2005-06 सुरू झाला. महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ मुंबई संचालनालयाने एस. डी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या आमच्या इस्लामपूरच्या कॉलेजला बाह्य पर्यवेक्षण शैक्षणिक अहवालामध्ये उत्कृष्ट श्रेणीने गौरविले आहे. या शिक्षण संस्थेला निम, शहरी व ग्रामीण परिसरात दर्जेदार शिक्षण देणारी व विविध शाखा उपलब्ध करून देणारी उत्कृष्ट संस्था म्हणून ही गौरविले जाते.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. एस. व्ही. जावरकर,आर्कि.स्मिता माने,प्रा.अमोल पाटील,विजय बोंगाणे उपस्थित होते.












































































