Last Updated on 02 Jan 2026 11:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूरच्या श्री गणेश नवरात्रोत्सव मंडळाचा उपक्रम
सांगली ।
‘रक्तदान श्रेष्ठदान’ ही केवळ घोषणा न देता सामजिक बांधिलकीची जाणीव ठेवत ३६७ जणांनी रक्तदान करून नववर्षाची सुरुवात केली. ईश्वरपूर येथील यल्लमा चौकातील श्री गणेश नवरात्रोत्सव मंडळ ईश्वरपुर या मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. निमित्त होते “नववर्षाचे स्वागत रक्तदानाने” या उपक्रमाचे!
नविन वर्षाच्या सुरुवातीला अनेकजण नवनवे संकल्प करीत असतात. पण ते काही दिवस टिकून राहतात. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तरुणांनी रक्तदान करण्यासाठी गर्दी केली होती. यात महिला पण आघाडीवर होत्या. “रक्तदान श्रेष्ठदान” याचे महत्त्व पटवून देण्यासाठी यल्लमा चौकातील श्री गणेश नवरात्रोत्सव मंडळ ईश्वरपुर या मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रयत्न करतात. नव्या पिढीला सामाजिक उपक्रमांची जाणीव करून देण्यात पुढाकार घेतात.
या जाणिवेतून सात वर्षांपूर्वी “नववर्षाचे स्वागत रक्तदानाने” हा उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला. आणि मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी तो मनावर घेतला.आणि लगेचच कृतीत आणला. सात वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एका बाजूला ३१ डिसेंबर धुमधडाक्यात साजरा करण्यात व्यस्त असणारी तरूणाई. आणि एक जानेवारीला नववर्षाचे स्वागत रक्तदानाने करण्यासाठी झटणारे मंडळाचे कार्यकर्ते ३१ डिसेंबरच्या रात्री उशिरापर्यंत रक्तदान शिबीरासाठी मंडप घालताना दिसले.
गुरुवारी सकाळी दहा वाजता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व ईश्वरपूर नगरीचे नगरसेवक आनंदराव पवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
ते म्हणाले, “रक्ताच्या नात्या पलीकडे जावून नवे नाते निर्माण करण्यासाठी रक्तदान शिबीरे उपयुक्त ठरतात. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण एकमेकांना भेटतो, पण आज रक्तदानाने दिलेल्या रक्ताच्या एका पिशवीतुन चार रुग्णांना आयुष्याची भेट दिली गेली. सामाजिक जाणिवेतून आज अनेकांनी रक्तदान केले. आम्ही या रक्तदात्याना सन्मान केला.
राजारामबापू रक्तपेढी, यशवंतराव चव्हाण रक्तपेढी कराड यांच्या वतीने रक्त संकलित करण्यात आले. मंडळाचे सदस्य धोंडीराम घोरपडे (पुजारी), भाऊ पाटील, श्रीकांत काळे, श्यामजी पटेल, संदीप पवार, विजय घोरपडे, विजय धुमाळे, तुषार खंडागळे, प्रितम काळे, शिवराज पुजारी, सुरज पन्हाळकर, गणेश खंडागळे, सागर भोजुगडे, अनंत नाईक, चंद्रकांत शिंदे, स्वप्नील पन्हाळकर, ललित तुळसणकर यांनी संयोजन केले. प्रशांत घोरपडे यांनी आभार केले.

बाप-लेकीचे रक्तदान…!
या शिबीरात शहरातील नियमित रक्तदाते विनोद मोहिते यांनी आपले वैयक्तिक ९७ वे रक्तदान केले. तर त्यांची कन्या सई मोहिते हिने दुसरे रक्तदान केले. ते म्हणाले,” रक्तदान चळवळ उभी करण्यासाठी व रक्तदाना बाबत अनेक गैरसमज त्याच्या प्रबोधनासाठी आमचे प्रयत्न आहेत.












































































