Last Updated on 14 Aug 2026 9:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमुळे देशात 100 सैनिक स्कूलना मान्यता मिळाली आहे. रेठरे धरण येथील एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल त्यापैकीच एक आहे. त्यामुळे येथील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची एनडीएसाठी निवड व्हावी, यासाठी संस्थेने प्रयत्न करावेत. एनडीएचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. त्यासाठी सर्वतोपरी मदत करू, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी आज केले.
रेठरे धरण येथील एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलच्या कॅडेट मेसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलचे प्रमुख आणि आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार धैर्यशील कदम, संस्थेचे संचालक सागर खोत, जिल्हा परिषद सदस्य मोहिनी खोत, सरपंच संदीप खोत, सी. बी. पाटील, डी. के. पाटील, बजरंग कदम, प्राचार्य बसवराज एच. यांच्यासह इतर मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या देशावर सुमारे ५०० वर्षे मुघलांनी आणि १५० वर्षे ब्रिटिशांनी राज्य केले. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील भेदाभेदाची दरी भरून काढत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘देशासाठी मरण पत्करले तरी चालेल’ असा नारा दिला जात होता. मात्र, आज देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी आपण देशासाठी जगले पाहिजे, असे ते म्हणाले. सैनिक स्कूलच्या माध्यमातून शिस्त, संस्कार, राष्ट्रभक्ती आणि नेतृत्त्वगुणांनी समृद्ध भावी पिढी घडवण्याचे कार्य घडावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन करताना संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. सागर खोत यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. देवकर यांनी मानले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून कॅडेट मेसचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वल करण्यात आले. तसेच स्वागत गीत सादर करण्यात आले. या मेसमध्ये 600 विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली.













































































