Last Updated on 04 Oct 2024 5:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
१ ऑगस्ट २०२४ पासून सभासद साखर प्रतिमहिना ७ किलोवरून प्रतिमहिना ९ किलो
दिवाळीला ९ किलो साखर, १ ऑक्टोबर २०२४ पासून दिवाळी साखर वाटप सुरू केली
कारखान्याची चारही युनिट वेळेवर सुरू करणार
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने सहवीज प्रकल्प व विस्तार वाढीसाठी घेतलेली प्रतिटन रुपये १४७ ची ठेव दोन टप्प्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना परत केली आहे. या ठेवींवरील,तसेच रुपांतरीत ठेवींवरील व्याज एकूण रक्कम रुपये ३ कोटी ४४ लाख येत्या ११ ऑक्टोबर २०२४ रोजी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करीत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतीक पाटील यांनी दिली
प्रतीक पाटील म्हणाले,आपण माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शना खाली २०१४ साली सहवीज व विस्तार वाढीचा महत्वकांक्षी प्रकल्प यशस्वी पूर्ण केला. या प्रकल्पासाठी प्रतिटन रुपये १४७ ची ठेव ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या कडून घेतली होती. ही एकूण रक्कम रुपये २४ कोटी १५ लाख इतकी होती. यातील प्रतिटन रुपये ७५ प्रमाणे एकूण रुपये १२ कोटी ३५ लाख दि.१ नोव्हेंबर २०२३ रोजी,तर उर्वरित प्रतिटन रुपये ७२ प्रमाणे एकूण रक्कम रुपये ११ कोटी ८० लाख दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना परत केले आहेत. यावरील व्याज रुपये २ कोटी ८९ लाख ५६ हजार,तसेच रुपांतरीत ठेव रक्कम रुपये ४ कोटी ८० लाखावरील व्याज रुपये ५४ लाख १ हजार, असे एकूण रक्कम रुपये ३ कोटी ४४ लाख दि.११ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करीत आहोत. सभासदांनी आमच्यावर जो विश्वास दाखविला होता,तो आम्ही सार्थ केला आहे.
आपण दि.१ ऑगस्ट २०२४ पासून सभासद साखर प्रतिमहिना ७ किलोवरून प्रतिमहिना ९ किलो केली आहे. तसेच दिवाळीला ९ किलो साखर देत आहोत. दि.१ ऑक्टोबर २०२४ पासून दिवाळी साखर वाटप सुरू केली आहे. कारखान्याच्या चारही युनिटमध्ये ऑफ सिझनची कामे गतीने सुरू असून कारखान्याची चारही युनिट वेळेवर सुरू करणार आहोत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेल्या सर्व ऊस आपल्या कारखान्यास देऊन सहकार्य करावे,असे आवाहन श्री.पाटील यांनी केले.
कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, माल खरेदी समितीचे अध्यक्ष देवराज पाटील, बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव पाटील, जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, सचिव डी.एम.पाटील,मुख्य लेखापाल संतोष खटावकर,जयकर फसाले प्रामुख्याने उपस्थित होते.












































































