Last Updated on 25 Oct 2026 1:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कृष्णा कॅम्पसमध्ये टाटा ऑटोकॉम्पचा भरती मेळावा
१३६५ जणांची नोंदणी, ४०० जणांना मिळणार रोजगाराची संधी
कराड : युवापिढीने आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर कठीण प्रवासाची आणि कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेडच्यावतीने आयोजित भव्य भरती मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात तब्बल १३६५ युवक-युवतींनी सहभाग नोंदविला असून, सुमारे ४०० जणांना नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे.
जयवंत इंजिनिअरिंग कॉलेज, कृष्णा फाउंडेशन आणि कृष्णा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या भरती मेळाव्याचे उद्घाटन आमदार डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विनायक भोसले, कृष्णा विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, सहाय्यक कुलसचिव अस्मिता देशपांडे, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सल्लागार डॉ. विनोद बाबर, जयवंत इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनंत गुजर, टाटा ऑटोकॉम्पचे एच.आर. मॅनेजर विकास सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉ. भोसले म्हणाले, की कराड भागातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी टाटा समूहाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. येत्या काळात टाटा समूहाला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ या भागातून उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. तसेच स्थानिक युवकांना मोठ्या औद्योगिक समूहांमध्ये काम करण्याची संधी मिळावी, त्यांना योग्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठीही विशेष प्रयत्न केले जातील.
टाटा ऑटोकॉम्पचे एच.आर. मॅनेजर विकास सूर्यवंशी यांनी कंपनीच्या कामकाजाची माहिती देताना सांगितले की, टाटा समूह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. वाहन उद्योगातील इंजिन वगळता कारचे विविध भाग तयार करण्याच्या कामात कंपनीचा सहभाग आहे. त्यामुळे उत्पादन, असेंब्ली, गुणवत्ता नियंत्रण आणि ऑपरेशन्स अशा विविध विभागांमध्ये युवकांना करिअर घडविण्याच्या संधी उपलब्ध आहेत. आज टाटा ऑटोकॉम्पमध्ये जगभरात सुमारे ३७ हजार कर्मचारी कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कृष्णा विद्यापीठाचे असिस्टंट एच.आर. मॅनेजर चेतन गोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन, उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला कृष्णा विद्यापीठाचे एच. आर. मॅनेजर विक्रम शिंदे, टाटा टोयो रेडिएटरच्या पुष्पांजली धापले, टाटा समूहातील विशाल आहेर, शुभम गराडे, कृत्तिक भादुरी, महेश कोळसे, श्रेयस धोंगडे, श्रीराम बदाणे, विक्रम यादव, विपुल पाटील, प्रवीण मोहिते, रुपेश शिबदे, विजय पडवळ, योगेश तणपुरे यांच्यासह युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यात हेल्पलाईन सुरु करणार
पुणे परिसरात रोजगारासाठी गेलेल्या युवक-युवतींना आवश्यक मार्गदर्शन व मदत मिळावी, यासाठी भविष्यात पुण्यात हेल्पलाइन सुरू करणार असल्याचा मानस आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला. या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराशी संबंधित माहिती मिळण्यास आणि योग्य संधींपर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.









































































