Last Updated on 03 Oct 2024 7:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भुईमूग,सोयाबीन,भात,तसेच ऊस पिकाचे मोठे नुकसान आले आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,नेर्ले गांवचे लोकनियुक्त सरपंच संजय पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या समवेत जिल्ह्याधिकारी कार्यालयात डॉ.दयानिधी यांना वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन दिले.
गेल्या ५-६ दिवसापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस चालू आहे. वाळवा तालुक्यात प्रति वर्षापेक्षा २०० टक्के जास्त पाऊस झालेला आहे. काही दिवसांपूर्वी येऊन गेलेल्या पुराच्या पाण्याखाली ५० टक्केपेक्षा जास्त जमीन क्षेत्र अडकले असून पिकांची मुळे कुजून जवळ-जवळ ८० टक्के पिकांचे नुकसान झालेले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांची मुळे जमिनीच्यावर आली आहेत. ऊसाची वाढ खुंटलेली आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या भुईमूग,सोयाबीन,भात आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी एकूण परिस्थितीचा विचार करून वाळवा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,असे आ.पाटील यांचे पत्र व निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी युवक राष्ट्रवादीचे राजू पाटील (कर्नाळ), राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक रमेश हाके,माजी संचालक माणिक शेळके,आष्टयाचे माजी नगरसेवक अर्जुन माने,युवक राष्ट्रवादीचे अनिल पाटील,अमित ढोले,सचिन पाटील, संजय सोनटक्के यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.












































































