Last Updated on 04 Jul 2026 8:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
बहे (ता. वाळवा) येथील शेतशिवारात सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बहे ते बोरगाव रस्त्यावर शेड जवळील शेतातून बाहेर पडताना बिबट्या दिसला. ही घटना तेथील मोबाईल कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.
शनिवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास बहे ते बोरगाव रस्त्यावर बहे येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश पाटील यांच्या शेतातील शेडजवळ बिबट्याचे दर्शन झाले. त्याचवेळी ज्ञानेश पाटील हे आपल्या शेडजवळच होते. त्यांच्या समोरच शेतातून बाहेर बहे -बोरगाव रस्त्यावर बिबटया येताना दिसला. हे चित्र ज्ञानेश पाटील यांनी जेसीबीमधून आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे.
दरम्यान, फार्णेवाडी येथे पंधरा दिवसापूर्वी एका वानरावर हल्ला करून त्या वानरासह बिबट्याने उसात धूम ठोकली होती. गेल्या काही दिवसांत कधी बहेच्या शिवारात,तर कधी फार्णेवाडीच्या शिवारात, काहीवेळा खरातवाडी रस्त्यावर तर कधी ईश्वरपूर-बहे रस्त्यावर बिबट्या अन् बछड्यांचे दर्शन यामुळे कृष्णाकाठ परिसर धास्तावला आहे.
शेतकरी आणि ग्रामस्थांनी अजिबात घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी आणि शेतात काम करताना पूर्णपणे सतर्क राहावे. रात्री-अपरात्री कुणीही एकटे शेतात जाऊ नये. शेतात जाताना सोबत नेहमी टॉर्च (बॅटरी), मोबाईल आणि हातात घुंगुरकाठी ठेवावी,” असे आवाहन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश पाटील यांनी केले आहे. दरम्यान, वनविभागाने तात्काळ या भागात शोधमोहीम राबवून या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा आणि पिंजरा लावावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.













































































