Last Updated on 12 Mar 2026 9:08 AM by Sanjay Patil/Adhorekhit
”आज जे आहे ते उद्या असेलच असे नाही, आणि जे आज नाही ते उद्याही नसेलच असेही नाही…”
मानवी स्वभाव आणि काळाची गती यांचा अभ्यास केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, जग हे स्वार्थाच्या एका अदृश्य धाग्याने बांधले गेले आहे. आपल्या आजूबाजूला वावरताना अशी अनेक माणसे दिसतात, जी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी नाती आणि संपर्क जपतात. गरज असेपर्यंत नम्रता आणि जवळीक साधणारी ही माणसे, स्वार्थ संपताच वाऱ्यासारखी बदलतात.
एक उदाहरण पाहा : उन्हाळ्याच्या कडाक्यात जेव्हा एखादे झाड सावली आणि गोड फळे देते, तेव्हा त्या झाडाखाली लोकांची प्रचंड गर्दी असते. प्रत्येकजण त्या झाडाचे गुणगान गातो. पण जसा ऋतू बदलतो आणि झाडाची पाने गळू लागतात, फळे संपतात, तेव्हा तीच माणसे त्या झाडाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. झाड मात्र तिथेच खंबीरपणे उभे असते. त्याला माहिती असते की, हा केवळ एका ऋतूचा खेळ आहे. पुन्हा वसंत येईल, पुन्हा पालवी फुटेल. माणसांचे वागणेही या ऋतूंसारखेच असते; स्वार्थाचा ऋतू आला की ते जवळ येतात आणि तो संपला की पाखरांसारखे उडून जातात.
परंतु, माणसाने एक गोष्ट विसरता कामा नये की, निसर्गाचा न्याय हा अत्यंत सूक्ष्म पण अचूक असतो. जो ‘कर्ता करविता’ ही सृष्टी चालवतो, त्याच्याकडे प्रत्येक कर्माची नोंद ठेवली जाते. कुणी आपला फायदा घेऊन बाजूला झाले, तरी त्यातून खचून जाण्याचे कारण नाही. कारण फायदा घेणाऱ्याचा स्वार्थ तात्पुरता असतो, पण झाडासारखे पाय घट्ट रोवून प्रामाणिकपणे काम करणाऱ्याची पुण्याई कायमस्वरूपी असते. काळ योग्य वेळी प्रत्येकाला त्याची जागा दाखवून देत असतो, त्यासाठी तो कोणताही मार्ग निवडू शकतो.
आज ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती किंवा अधिकार आहेत, त्यांनी हा माज बाळगू नये की हे कायमस्वरूपी आहे. तसेच ज्यांच्याकडे आज काहीच नाही, त्यांनी निराश होण्याचे कारण नाही. कारण काळाचे चक्र सतत फिरत असते. ‘बॅलन्स’ करण्याचा तो ईश्वरी नियम कधीच चुकत नाही. जो दुसऱ्याचा वापर करून घेतो, त्याला त्याच भाषेत उत्तर मिळते, तर जो निस्वार्थ भावनेने आपले काम करत राहतो, त्याचे यश कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.
शेवटी, लोकांच्या बदलण्याने किंवा त्यांच्या कृतघ्नतेने अस्वस्थ न होता, निश्चिंत मनाने आपले सत्कर्म करत राहणे, हाच सुखी राहण्याचा एकमेव मार्ग आहे. काळ कुणाचेही देणे बाकी ठेवत नाही, हाच आजवरचा सर्वात मोठा अनुभव आहे.










































































