Last Updated on 28 Apr 2026 4:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
‘कृष्णा’चा नवा टप्पा : ठिबक सिंचनासाठी ए.आय. तंत्रज्ञान वापरणार
ईश्वरपूर ।
कृष्णा कारखान्याने आज नावीन्यपूर्ण योजना राबवत सहकारात आदर्श निर्माण केला आहे. लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेला य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना आज प्रगतीच्या नव्या टप्प्यावर पोहोचला आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. पेठ (ता. वाळवा) येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक लिंबाजी पाटील, संजय पाटील, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक अतुल पाटील, संपतराव पाटील, आत्मशक्ती पतसंस्थेचे चेअरमन अभिराज पाटील, जिल्हा परिषद सदस्या मंदा माळी, धोंडीराम कदम, शिवाजी केनचे संचालक संदीप पाटील, कृष्णा बँकेचे संचालक नामदेव कदम, माजी संचालक फिरोज ढगे, संग्राम वारके, शेखर बोडरे, दिलीप पाटील, विजय पाटील, मोहन मदने, पूनम पाटील, उपसरपंच खलिल मुल्ला, माजी सरपंच हेमंत पाटील, माजी उपसरपंच जयंत पाटील, हंबीरराव पाटील, शहाजी नायकल, जयकर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सुरेश भोसले पुढे म्हणाले, आगामी काळात जलसिंचन योजनांचे नूतनीकरण करण्यासाठी शासनाची मदत मिळवून नवीन योजना राबवण्याचा मानस आहे. संपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट असून, यासाठी आधुनिक ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ठिबक सिंचनामुळे शेती उत्पादनात निश्चितच वाढ होईल. कृष्णा कारखान्याने स्वतःच्या विविध योजना सुरू करून साखर उद्योगात वेगळी ओळख निर्माण केली आहे. नंतर इतर कारखान्यांनीही त्याचे अनुकरण केले. कारखान्याचे आधुनिकीकरण करत क्षमता वाढ केली आहे. मोफत घरपोच साखर, सभासदांना नेहमीच चांगला दर देत, अनेक वेळा उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. राज्य व देशपातळीवरील अनेक पुरस्कारही कारखान्याने पटकावले आहेत.
गेल्या ११ वर्षांत कारखान्यात मोठ्या प्रमाणात बदल व सुधारणा करण्यात आल्या आहेत. इथेनॉल प्रकल्प उभारणे, डिस्टिलरीमध्ये सुधारणा करणे यांसारख्या उपक्रमांमुळे कारखाना अधिक सक्षम झाला आहे. इतर अनेक कारखान्यांना तोटा सहन करावा लागला असताना कृष्णा कारखान्याने मात्र स्थिरता राखली आहे, असे डॉ. भोसले म्हणाले.
अतुल पाटील म्हणाले, कृष्णा कारखान्याने फक्त साखर निर्मिती न करता या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये सर्वांगीण विकासाची भूमिका घेतली आहे. डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखाना उत्कृष्टपणे कामकाज करत आहे. येत्या काळातही आम्ही डॉ. सुरेशबाबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहोत.
अभिराज पाटील म्हणाले, गेल्या ११ वर्षात डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या कामगिरीचा आलेख उंचावत राहिला आहे. आगामी काळातही ही घौडदौड सुरू रहावी, ही सदिच्छा आहे.
यावेळी मोहन मदने यांनी मनोगत व्यक्त केले. फिरोज ढगे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. शिवाजी केनचे संचालक संदीप पाटील यांनी आभार व्यक्त केले.












































































