Last Updated on 28 Apr 2026 6:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूरच्या दत्त नागरी सहकारी पतसंस्थेच्या हॉलमध्ये ‘योग पंडित’ पदवीधारकांचा गौरव
ईश्वरपूर ।
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांनी सर्वांनाच विळखा घातला आहे. अशा काळात योग ही केवळ शारीरिक व्यायामाची पद्धत नसून, मानसिक आणि आध्यात्मिक विकासाचे प्रभावी साधन आहे, असे प्रतिपादन माजी आमदार व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले. योग विद्या धाम पेठ शाखेच्या वतीने आयोजित ‘योग पंडित’ पदवी प्राप्त साधकांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
योग विद्या गुरुकुल, नाशिक येथून ‘योग पंडित’ पदवी प्राप्त केल्याबद्दल आशादेवी पाटील, विनय माळी, अमरसिंह पाटील आणि कविता शहा यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच ग्रामीण भागात योगाचा प्रचार करणारे शिक्षक स्नेहा हाके, सचिन फल्ले, पल्लवी कोरे, अभिजित निंबाळकर, श्रीनिवास बागल, बाजीराव जाधव, बंडू मते, दीपक पाटील आणि श्रेया शिंदे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि दत्त नागरी पतसंस्थेचे संस्थापक प्राचार्य डॉ. पी. बी. कुलकर्णी यांनी गुरु-शिष्य परंपरेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, आजच्या शिक्षण पद्धतीत जुनी गुरुकुल परंपरा लोप पावत असताना योग विद्या गुरुकुलने मात्र ही पद्धत आजही टिकवून ठेवली आहे. जशी अर्थशास्त्रात तेजी-मंदी येते, तशीच ही गुरुकुल परंपरा पुन्हा एकदा नक्कीच वैभव प्राप्त करेल.
यावेळी प्राचार्य एस. आर. चौगुले, योग विद्या धामचे अध्यक्ष अरुण कदम, बळवंत फाळके, प्रभाकर जंगम, अंकुश खोत, विनायक जगताप, संजय पाटील, अरविंद पाटील यांच्यासह पेठ, वशी, ऐतवडे, चिकुर्डे, देववाडी, कामेरी आणि ईश्वरपूरमधील योगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राधिका कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.












































































