Last Updated on 19 Feb 2026 2:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे |
अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती आज संपूर्ण देशासह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि मंगलमयी वातावरणात साजरी करण्यात आली. महाराजांचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक किल्ले शिवनेरीवर मुख्य शासकीय जन्मोत्सव सोहळा पार पडला. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या गजराने अवघा शिवनेरी गड आणि परिसर दुमदुमून गेला होता.
या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गडावर उपस्थित होते. शिवजन्मस्थळावर मान्यवरांच्या हस्ते परंपरेनुसार सोन्याचा पाळणा जोजवण्यात आला आणि पुष्पवृष्टी करून शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.गडावर पहाटेपासूनच शिवभक्तांची मांदियाळी जमली होती, तर संपूर्ण गड परिसर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.
छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज भारताचा इतिहास आणि भूगोलही वेगळा असता असे नमूद करून श्री. फडणवीस म्हणाले, अनेक राजे-रजवाडे मोगलांच्या आधीपत्याखाली काम करत असताना आई जिजाऊंनी घडविलेल्या छत्रपती शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करून हिंदुस्थानाला नवी दिशा दिली. छत्रपती शिवरायांनी १८ पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. ‘हे माझे राज्य नसून रयतेचे राज्य आहे,’ अशी भूमिका त्यांनी घेतली. देव, देश आणि धर्मासाठी लढा देण्याची प्रेरणा देत त्यांनी सामान्य जनतेला मोगलांच्या जोखडातून मुक्त करण्याचे कार्य केले. त्यांच्या राज्यात समता, सन्मान, न्याय आणि स्त्रीसुरक्षा यांना प्राधान्य होते. शेतकरी समाधानी राहील, अन्याय-अत्याचार होणार नाहीत, अशी राज्यव्यवस्था त्यांनी उभी केली, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आठवण जिजाऊंची आणि वसा विचारांचा
उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच शिवनेरीवरून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्या काहीशा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या, “आजचा दिवस माझ्यासाठी केवळ आनंदाचा नाही, तर एका मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. ज्या कठीण परिस्थितीत मी पदाची शपथ घेतली, त्यावेळी माझ्या डोळ्यांसमोर केवळ जिजाऊ माँसाहेबांची मूर्ती उभी होती. त्यांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, तर संकटांशी झुंज देण्याची जिद्द आणि स्वराज्याचे संस्कार दिले. तीच जिद्द घेऊन मला राज्याची सेवा करायची आहे.”

भक्ती आणि शक्तीचा संगम
शिवनेरीच्या तटबंदीवर भगवे ध्वज फडकवत तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. शासकीय सोहळा आटोपल्यानंतर सर्व मान्यवरांनी शिवनेरीवरील शिवाई देवीचे दर्शन घेतले. अत्यंत शिस्तबद्ध आणि चैतन्यमयी वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने शिवभक्तांच्या मनात पुन्हा एकदा स्वराज्याचा स्वाभिमान जागा केला.
शिवाई देवी मंदिरातही धार्मिक विधी पार पडले. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते शिवाई देवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा शासकीय अभिषेक करण्यात आला. गड परिसरात जयजयकाराचा निनाद होत होता. राज्यातील विविध भागांमध्येही मिरवणुका आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कल्याणमध्ये 422 किल्ल्यांच्या नावांचा वापर करून शिवछत्रपतींचे तेजस्वी पोर्ट्रेट उभे करण्यात आले. संशोधक-कलावंत डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी दोन दिवसांच्या परिश्रमातून ही कलाकृती साकारली.













































































