Last Updated on 07 Jan 2026 8:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
व्यासपीठावर उभे राहून बोलताना ‘मी’पणा टाळणे ही केवळ भाषिक शिस्त नसून, प्रभावी संवादाची गुरुकिल्ली आहे. संघर्षातून पुढे आलेल्या व्यक्तींच्या कथा लोकांना नक्कीच भावतात; मात्र त्या कथा प्रेरणेसाठी असाव्यात, आत्मगौरवासाठी नव्हे. अनेकदा यश मिळाल्यानंतर माणूस नकळत प्रवचनकार किंवा कीर्तनकार बनतो आणि भाषणाचा रोख ‘अनुभव सांगणे’ याऐवजी ‘स्वतःची उंची मोजणे’ असा होतो. इथेच संवाद तुटू लागतो.
सभागृहात बसलेला श्रोता भाषण ऐकायला येतो, उपदेश ऐकायला नाही. सतत ‘मी हे केलं’, ‘मी तिथे होतो’, ‘माझ्यामुळे हे घडलं’ अशा वाक्यांची पुनरावृत्ती झाली की श्रोत्यांचा संयम सुटतो. लोक थेट नाराजी व्यक्त करत नाहीत; मात्र टाळ्यांचा ओघ कमी होतो, नजर मोबाईलकडे वळते आणि प्रतिसाद बोथट होतो. हे संकेत अनुभवी वक्त्याला लगेच कळतात.
अनेक वेळा भाषणानंतर “छान बोललात” असे कौतुक ऐकू येते. पण हे कौतुक नेहमीच मनापासून असतेच असे नाही. ते सभ्यतेचा भाग असू शकते. आपले म्हणणे श्रोत्यांपर्यंत पोहोचले की नाही, हे भाषण चालू असतानाच कळते. जागेवरच पसंती-नापसंती उमटत असते; त्यासाठी वेगळ्या प्रमाणपत्राची गरज नसते.
याचवेळी “मी वक्ता नाही” असे वाक्य उच्चारणे ही आणखी एक मोठी चूक ठरते. हे वाक्य विनयशील वाटत असले, तरी प्रत्यक्षात ते आत्मघातकी आहे. वक्ता नसाल तर व्यासपीठावर का उभे राहिलात, असा प्रश्न श्रोत्यांच्या मनात नकळत निर्माण होतो. आत्मविश्वासाशिवाय संवाद होत नाही आणि संवादाशिवाय प्रभाव निर्माण होत नाही.
आजच्या काळात श्रोते ‘मी’च्या कथा ऐकायला आलेले नसतात. त्यांना स्वतःशी नातं जोडता येईल असा आशय हवा असतो. Nobody likes ‘I stories’ हे सूत्र जितके साधे आहे, तितकेच ते प्रभावी आहे. ‘मी’ऐवजी ‘आपण’, ‘आपल्या अनुभवातून आपण काय शिकलो’, ‘यातून सर्वांसाठी काय बोध आहे’ असा सूर पकडला, तरच भाषण श्रोत्यांच्या मनात घर करते.
थोडक्यात, व्यासपीठावर मोठेपण सिद्ध करण्यासाठी नव्हे, तर लोकांना सोबत घेण्यासाठी बोलावे. आत्मगौरव नव्हे, तर आत्मसंवाद घडला की भाषण प्रभावी ठरते आणि तेच खरे यश.
प्रा.डॉ.संजय थोरात
इस्लामपूर
![]()
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 10 Mar 2026 10:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । राज्यातील मोजणी प्रकरणांचा जलद, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण निपटारा करण्यासाठी खासगी परवानाधारक भूमापक व भूमापन अभिकरणां... Read more














































































