सांगली । महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस, राज्यातील साखर कामगारांचे जेष्ठ नेते शंकरराव रामचंद्र भोसले (वय ७४) यांचे शुक्रवारी रात्री ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते राज्यातील साखर कामगारांची पगारवाढ निश्चित करणाऱ्या राज्य शासन, साखर संघ व कामगार संघटनेच्या त्रिपक्षीय समितीचे सदस्य होते.
कासेगाव (ता.वाळवा) हे त्याचे गांव आहे. शुक्रवारी सायंकाळी फिरून आल्या नंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने कराड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान त्यांचे निधन झाले. शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर कासेगाव येथील कृष्णा नदीच्या तिरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील, राज्य प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, माजी जि.प. अध्यक्ष देवराज पाटील यांच्यासह साखर उद्योग व विविध क्षेत्रातील मान्यवर,नातेवाईक व ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते. माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या पश्चात पत्नी,अविवाहित मुलगा, विवाहित दोन मुली, भाऊ-चुलतभाऊ, पुतणे असा एकत्रित मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दि.५ मे रोजी सकाळी ९ वाजता कासेगाव (ता.वाळवा) येथे होणार आहे.
ते गेल्या ४० वर्षापासून कामगार चळवळीत कार्यरत होते. त्यांच्यावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या विचारांचा पगडा होता. ते माजी मंत्री आ.जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक होते. एक शांत,संयमी,अभ्यासू, आणि संघर्षाऐवजी संवाद व समन्वयातून कामगारांना न्याय मिळवून देणारा जेष्ठ नेता हरपल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.