इस्लामपूर हायस्कूलच्या १९९६ दहावी बॅचमधील मुलींची कृती कौतुकास्पद..!
गेट-टूगेदरच्या निमित्ताने जपली सामाजिक बांधिलकी
सांगली । इस्लामपूर येथील इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूरच्या १९९६ च्या दहावीच्या बॅचमधील मुलींच्या एका गटाने माणुसकीचं नातं प्रतिष्ठानच्या अभ्यासिकेला ५ हजार ५०० रुपयांचा निधी दिला. तो निधी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तके खरेदीसाठी वापरला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली गेली. अभ्यासिकेतील गरजू विद्यार्थ्यांना यानिमित्ताने छोटासा हातभार लावण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
इस्लामपूरच्या सर्व माहेरवाशीनी गेट-टूगेदरच्या निमित्ताने दोन दिवसांपुर्वी एकत्रीत आल्या होत्या. इस्लामपूर हायस्कूल मधून १९९६ ला एका वर्गातून दहावी उत्तीर्ण होत शिक्षणाच्या प्रवाहात वेगवेगळ्या वाटा निवडल्या होत्या. त्यानंतर वेगवेगळ्या करियर मध्ये असणाऱ्या सर्व वर्ग मैत्रिणी पहिल्यांदा जमल्या होत्या. शाळेतील आठवणींमध्ये रमत धम्माल, व एन्जॉय केला. पूर्ण दिवस गप्पा गोष्टी झाल्यावर जाताना सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून निधी संकलन करण्याचे ठरले. २० जणींच्या गटाने अवघ्या काही वेळात ५ हजार ५०० चा निधी जमवला.
याचं करायचे काय ? म्हणत या मुलींनी आपल्याच बॅचचा वर्गमित्र विनोद मोहिते यांना संपर्क साधला. त्यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या माणुसकीचं नातं प्रतिष्ठांनच्या अभ्यासिकेला निधी द्यावा असे सुचवले.
स्वाती जरे, वैशाली पाटील, स्नेहल कुंभार, मनीषा खराडे, मेघा खरात, सुनयना नार्वेकर, अनिता मोरे, अर्चना जाधव, सरिता बोटकर, उज्वला बारटक्के, स्मिता वायचळ, शर्मिला भंडारे, मनीषा जाधव, गुलरुख मोमिन, शीतल गोटखिंडे, धनश्री माळी,वैशाली पाटील यांनी निधी संकलन केले.
हेही वाचा – माणुसकीचं नातं! इस्लामपूरमध्ये शिबिरात ६७१ जणांनी केले रक्तदान
या ग्रुपमधील स्वाती जरे, गुलरूख मोमीन, मेघा खरात या तिघींनी सर्वांच्या वतीने पुढाकार घेत संकलित निधी अभ्यासिकेत येवून रोख रक्कमेच्या स्वरूपात दिला. प्रतिष्ठानचे सदस्य संपत वारके यांनी निधी स्वीकारला. अभ्यासिकेतील कामकाजाची माहिती घेत अभ्यास करणाऱ्या मुलांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आम्ही केले …तुम्ही पण करा…!
सुट्टी मध्ये आता सर्वत्र गेट-टुगेदरचे उपक्रम साजरे केले जात आहेत. दहावी उत्तीर्ण वर्षातील सर्वच मित्र-मैत्रिणी एकत्र येतात, आनंद साजरा करतात आणि घरी निघून जातात. यापेक्षा वेगळं काहीतरी करता यावं यासाठी आम्ही १९९६ च्या बॅचमधील काही मुली एकत्रित आलो होतो. यात कोण शासकीय सेवेत आहेत. तर कोणी वकील, डॉक्टर, शिक्षक आहेत. कोणी संसारात व मुलांच्या संगोपनात आहेत. अशा सर्वजणी वेळ काढून एकत्रित आलो. गेट-टुगेदर झाला.तो झाल्यानंतर समाजाचे काहीतरी देणे लागतो या भूमिकेतून आम्ही काही निधी आमच्या परीने संकलित केला. आणि तो अभ्यासिकेसाठी उपलब्ध करून दिला आहे. यातून पुस्तके खरेदी केली जातील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गोर-गरीब मुलांना ती उपयुक्त ठरतील. गेट-टुगेदरचे निमित्ताने आम्ही केले.. तुम्ही पण नक्की सामाजिक बांधिलकी जपा असा संदेश या सर्व मुलींनी दिला.