सांगली । इस्लामपूर येथील माणुसकीचं नातं प्रतिष्ठानने महाराष्ट्र व कामगार दिनाच्या निमित्ताने गुरुवार दिनांक १ मे रोजी इस्लामपूर येथे आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिरामध्ये ६७१ जणांनी रक्तदान केले. प्रारंभी सेवानिवृत्त प्राचार्य विश्वास सायनाकर, राजारामबापू बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले.
कोरोना काळात स्थापन झालेली माणुसकीचं नातं प्रतिष्ठान इस्लामपूर ही एक सेवाभावी उपक्रम राबवणारी विश्वासार्ह नोंदणीकृत संस्था आहे. विविध सामाजिक उपक्रमांबरोबरच या प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराचे हे पाचवे वर्ष होते. येथील सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉलमध्ये सकाळी सात वाजता या शिबिराला प्रारंभ झाला. कडक उन्हाळा असूनही दिवसभर ६७१ जणांनी रक्तदान केले तर हिमोग्लोबिन, वजन, ब्लड प्रेशर; अशा काही कारणांमुळे विद्यार्थ्यांसह शंभरहून अधिक जणांना इच्छा असूनही रक्त देता आले नाही.
प्रारंभी विश्वास सायनाकर, प्रा. शामराव पाटील, तसेच या प्रतिष्ठानचे मुख्य प्रवर्तक पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, प्राचार्य डॉ.ए.एम.जाधव, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. संजय हरदास, डॉ.नरसिंह देशमुख,डॉ. प्रदीप शहा, उद्योजक सर्जेराव यादव, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, एक्साईज विभागाचे प्रशांत रासकर, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.राजेंद्र कुरळपकर, डॉ.एन.टी.घट्टे,प्रा. डॉ. संजय थोरात आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
गरजेनुरूप गरजूंना यथाशक्ती सहाय्य, गरीब रुग्णांना आधार, ५० विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका असे अनेकविध सामाजिक उपक्रम केवळ माणुसकीचं नातं परिवार सदस्यांच्या उस्फूर्त व सक्रिय सहभागातून सुरू आहेत; या साऱ्या उपक्रमाबद्दल प्रमुख मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. पोलीस उपाधीक्षक पिंगळे यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमांचा आढावा घेतला. मान्यवरांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ.अशोक शिंदे यांच्यासह उपाध्यक्ष उमेश कुरळपकर, सचिव प्रा.डॉ.महेश जोशी, खजिनदार गौतम रायगांधी यांनी केले.
हेही वाचा – कौतुकास्पद! साडेपाच हजारांचा निधी माणुसकीचं नातं प्रतिष्ठानच्या अभ्यासिकेला…
उद्योजक दीपक कोठावळे यांनी सूत्रसंचालन तर प्रतिष्ठान कार्यकारणी सतीश सूर्यवंशी, विकास राजमाने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत वारके, शुभम यादव, अमित यादव,अजित येडगे,डॉ.उमेश जाधव, प्रा.डॉ.जी के. किर्दत तसेच इस्लामपूर जायंट्स ग्रुप, इस्लामपूर व्यायाम मंडळ,मॉर्निंग गार्डन ग्रुप व सहकारी, आदीनी संयोजन केले. इस्लामपुरातील विक्रमी रक्तदान केलेल्या गजानन परब तसेच पत्रकार विनोद मोहिते, पत्रकार निवास पवार यांचाही सन्मान करण्यात आला.
दिनांक १ मे २०२१ पासून प्रतिवर्षी ६६२, ९०५, ९१४, ६३० व आता ६७१ इतके विक्रमी रक्त संकलन झाले. शिस्तबद्ध शिबिर व्यवस्थेसाठी राजारामबापू रक्तपेढी इस्लामपूर यांच्यासह शिवशंभो मोहोळ, यशवंतराव चव्हाण ब्लड बँक कराड, हिंदरत्न प्रकाशबापू सांगली, वसंतदादा ब्लड बँक मिरज, महात्मा गांधी ब्लड बँक पारगाव, आदर्श ब्लड बँक सांगली, महालक्ष्मी ब्लड बँक कागल; या रक्तपेढ्यांनी सहभाग घेतला.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आपला जिल्हा आणि परिसरात बहुतांश ब्लड बँकांमधून मोठ्या प्रमाणावर रक्त टंचाई आहे. त्यामुळे अशा शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना, अपघातग्रस्तांना मोठा आधार मिळेल.