नांदेड । जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी व्हीव्हीपॅटची जुळते का याची तपासणी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे करण्यात आले. यात जिल्ह्यातील लोकसभेच्या ३० आणि विधानसभेच्या ४५ अशा एकूण ७५ केंद्रावरील मतमोजणी बिनचूक असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
लॉटरी पद्धतीनुसार मतदान केंद्राची निवड सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष चिठ्ठी काढून केली होती. प्रत्येकवेळी निवडणूक संपल्यानंतर ही प्रक्रिया पार पाडली जाते. तर मोजणीची प्रक्रिया निवडणूक निरीक्षकांच्या पुढे केली जाते. हे निवडणूक निरीक्षक वेगवेगळ्या राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी असतात. नांदेडमध्ये देखील ही प्रक्रिया पार पाडली गेली आहे. मतमोजणी दरम्यान, प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्र निहाय ५ व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठया प्रत्यक्ष मोजल्या जातात. त्यांची ईव्हीएम मधील मतांसोबत पडताळणी केली जाते.
Recent Posts
या ५ केंद्रांची निवड लॉटरी पद्धतीने सर्व उमेदवार मतमोजणी प्रतिनिधी यांचे समक्ष चिठ्ठी काढून होते. ही प्रक्रिया निवडणूक निरीक्षक यांचे समोर होते. त्यानंतर व्हीव्हीपॅट चिठठी मतमोजणी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मोजल्या जातात. सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी ५ प्रमाणे ४५ मतदान केंद्रांची व्हीव्हीपॅट पडताळणी करण्यात आली असून सर्व ४५ ठिकाणी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम कंट्रोल युनिट यातील उमेदवार निहाय मतांची आकडेवारी पूर्णतः जुळली आहे.
तसेच लोकसभा पोटनिवडणुकीसाठी लोकसभेतील ६ विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी ५ प्रमाणे ३० मतदान केंद्रांसाठी व्हीव्हीपॅट पडताळणी करण्यात आली असून सर्व ३० ठिकाणी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम कंट्रोल युनिट यातील उमेदवार निहाय मतांची आकडेवारी पूर्णतः जुळली आहे असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.
साभार : प्रसार भारती