Last Updated on 18 Nov 2024 3:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राज्यातील जनतेचा प्रतिसाद पाहता, राज्यात आपल्या महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. मी राज्यात प्रचारासाठी फिरत असताना आपण सर्वांनी मजबुतीने आपला मतदारसंघ सांभाळला आहे. आपला मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित आहे. मतदारसंघातील सामान्य जनता व कार्यकर्ता हीच माझी ताकद आहे,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ.जयंत पाटील यांनी गांधी चौक येथील जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला.
जेष्ठ नेते दिलीपतात्या पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील, यशवंत गोसावी, प्रा.शामराव पाटील, ॲड.चिमण डांगे,शहराध्यक्ष शहाजी पाटील, मैनुद्दीन बागवान, सुभानअली शेख, प्रा.सुकुमार कांबळे, काँग्रेस पक्षाचे शाकीर तांबोळी, ॲड. मनीषा रोटे, शिवसेनेचे शकील सय्यद, बळीराजा शेतकरी संघटनेचे बी.जी.पाटील, पुरोगामी आघाडीचे कॉ.धनाजी गुरव, माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील, प्रा.अरुणादेवी पाटील, मुनीर पटवेकर, खंडेराव जाधव, महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात,संदीप पाटील, शैलेश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.जयंत पाटील म्हणाले,आपले घड्याळ चिन्ह चोरीला गेले आहे. न्यायालयाने आदेश दिला आहे की,हा विषय न्याय प्रविष्ट आहे,पवारसाहेबांचा फोटो वापरू नका. आपला पक्ष फुटला त्यावेळी त्यांच्या जीवावर मोठे झालेले अनेक दिग्गज नेते त्यांना सोडून गेले. मात्र आपण सर्वांनी पुरोगामी विचारांचा आग्रह धरणारे शरदचंद्र पवारसाहेबांच्यामागे उभा राहण्याचा निर्धार केला. पूर्वी ते सगळे पक्षात असताना फक्त ४ खासदर होते. मात्र ते सगळे गेल्यानंतर राज्यातील जनतेने आपले ८ खासदर निवडून दिले हवेत. या निवडणुकीत आपण ८८ उमेदवार पवारांच्या नेतृत्वाखाली उभे केले आहेत. चांगल्या संख्येने आपल्या पक्षाचे उमेदवार विजयी होतील.
आपले सरकार असताना भुयारी गटार,२४ बाय ७ पाणी योजना आपण मंजूर करून आणली. शहरात व मतदार संघात जे-जे मोठे काम झाले आहे ते आपण केलेले आहे. या शहराचा नाव लौकिक होता,तो आज अडचणीत आला आहे. अनेक समस्या आहेत. पुन्हा एकदा दुरुस्ती करण्यासाठी आपण सत्तेत असणे आवश्यक आहे. केवळ शहरच नाही तर आपल्या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलू. इथे कधी,कुणाला त्रास दिला नाही,कळ काढली नाही. नेहमी लोकशाहीचा अवलंब केला. सगळे विरोधक नंतर आपल्याकडेच येतात. त्यामुळे मी गप्प राहतो. राज्यात काम करताना कधीही मान खाली घालण्याची वेळ येऊ दिली नाही. मंत्री होतो म्हणून मस्ती दाखवली नाही. सत्ता डोक्यात जाऊ दिली नाही. सामान्य माणसाचे प्रश्न हे वेगळे जग आहे आणि कारखानदारी वेगळी. मी मतदारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आपले सरकार आल्यानंतर आपण आपल्या पंचसूत्री जाहीरनाम्या प्रमाणे राज्यातील शेतकरी,महिला,युवक व सर्वसामान्य माणसाच्यासाठी कल्याणकारी योजना राबविणार आहोत. तुमच्या सगळ्यां च्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची संधी तुमच्या हातात आहे. अमित शहा,योगी आदित्यनाथ हे १८ व्या शतकाची भाषा करीत आहेत. बटेंगे तो कटेंगे म्हणत आहेत.आमची पढेंगे तो बढेंगे ही भूमिका आहे.
दिलीपतात्या पाटील म्हणाले, जयंत पाटील यांना घेरणारी औलाद अजून महाराष्ट्रात जन्माला आली नाही. विरोधी उमेदवार अनुकंपाखाली आलेले आहेत. बापूंचे नाव घेऊन मोठे झाले. सूर्याजी पिसाळ बनून नगराध्यक्ष झाले. आमदारकीची स्वप्ने पडली. महाविकास आघाडी सरकारात जयंत पाटील यांचा एकच चेहरा असेल. आपल्या मतदारसंघाचे ते भाग्य असेल. अजित पवारांना गांभीर्याने घेऊ नका, ते ईडीच्या भीतीने तिकडे गेलेत.
शाकिर तांबोळी म्हणाले,राज्यातील जनता महायुतीच्या कारस्थानाने तावून सुलाखून निघाली आहे. त्यांनी अल्पसंख्याकांसाठी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. केवळ विरोध म्हणून घडयाळ चिन्हावर लढणारे उद्या पुन्हा भाजपात जाणार आहेत. संविधान मानणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला सत्तेत आणूयात.
यशवंत गोसावी म्हणाले, अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष चोरला,चिन्ह चोरले आणि इस्लामपुरात उमेदवारही चोरला. काही उमेदवार स्वार्थासाठी बाप बदलतात. निष्ठा काय असते हे दाखवणारा मुख्यमंत्री जयंत पाटील यांच्या रूपाने महाराष्ट्राला पाहायचाय.
यावेळी मुस्लिम समाजाचे नेते सुभानअली शेख,माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील, प्रा.अरुणादेवी पाटील, मुनीर पटवेकर, महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात, युवती शहराध्यक्षा दीपाली साधू यांचीही भाषणे झाली.
याप्रसंगी नेताजीराव पाटील, विश्वनाथ डांगे, ॲड.धैर्यशिल पाटील, पिरअली पुणेकर, अरुण कांबळे, आपचे गजानन पाटील, रणजित मंत्री,रोझा किणीकर, कमल पाटील, कोमल बनसोडे, शंकरराव चव्हाण यांच्यासह शहरातील माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
टिकाकारांचे आभार…
अजितदादा पवार आपल्याकडे दोनदा येऊन टीका करून गेले. त्यांचे मी आभारच मानतो. कारण इथे येऊन कोणीतरी टीका केल्याशिवाय आमच्या कार्यकर्त्यांना स्पीड येत नाही. माझ्यावर जितकी टीका होते, तितके माझे काम सोपे होते,अशी मिश्किल टिपण्णीही आ.पाटील यांनी केली.












































































