Last Updated on 06 Nov 2024 6:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर । विधानसभा निवडणुकीसाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. या दिवशी व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर कोणतीही आस्थापना, कंपन्या, संस्थामधील काम करणारे सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. ज्या आस्थापनांना अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत आस्थापनांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. याबाबत आस्थापनांनी जिल्हाधिकारी यांना लेखी अर्ज करुन सवलत प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी केले आहे.
शासनाने परिपत्रक प्रसारित केले असून त्यानुसार लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 मधील कलम 135 (ब) तरतुदीनुसार आदेश देण्यात आले आहेत. मतदाना दिवशी मतदानासाठी भरपगारी सुट्टी दिली नसल्यास तक्रारीसाठी स्वतंत्र दक्षता कक्ष स्थापन केला असून कामगार आपली तक्रार सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, 579, ई वॉर्ड, शाहूपूरी , व्यापारीपेठ, कोल्हापूर येथे व aclkolhapur@gmail.com या ईमेल वर अथवा पुढील मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्स ॲपवर 9146475050 सर्व माहितीनिशी दाखल करु शकतात.
मतदानादिवशी कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुटी देणे बंधनकारक
मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २० नोव्हेंबरला सुटी न दिल्यास नियोक्त्यांविरोधात कारवाई केली जाईल, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
मतदानादिवशी कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुटी देणे हे व्यापार, उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आणि अन्य सर्व आस्थापनांसाठी बंधनकारक असेल. या सुटीच्या बदल्यात संबंधित व्यक्तीच्या वेतनात कोणत्याही प्रकारची कपात करता येणार नाही. या नियमांचे किंवा तरतुदींचे कोणत्याही नियोक्त्याने उल्लंघन केल्यास त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कारवाई केली जाईल. पूर्ण दिवसाची सुटी देणे शक्य नसल्यास त्यांना किमान चार तासांची सवलत देता येईल. परंतु, अशाप्रकारच्या सवलत प्रकरणांमध्ये, जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. सुटी किंवा सवलत प्राप्त न झाल्याने एखाद्या व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित नियोक्त्याविरोधात योग्य कारवाई करण्यात येईल. त्यामुळे, उद्योग विभाग अंतर्गत येणारे सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आदी आस्थापनांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून दिलेल्या या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देशही गगराणी यांनी दिले आहेत.












































































