Last Updated on 09 Oct 2024 7:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
परभणी | शारदीय नवरात्र महोत्सव, दसरा, दिवाळी निमित्त उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. त्यामुळे भगर खाताना काळजी घ्यावी. असे आवाहन अन्न व औषध प्रशासन अ.ए. चौधरी यांनी केले आहे
भगर पिकावर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये (टॉक्जीन) तयार होतात. ऑक्टोबर व नोंव्हेबर महिन्यातील तापमान आणि आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. अशा बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते.
भगर खाताना अशी घ्या काळजी
बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. बॅड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सुटी/मोकळी भगर घेऊ नका. भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा. भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवा, जेणेकरुन वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका. शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता आधिक असते. त्यामुळे पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी.
सार्वजनिक कार्यक्रमांसाठी भगर मोठ्या गंज/भांड्यामध्ये चुलीवर शिजविल्या जाते, अशावेळी एकसमान उष्णता न मिळाल्याने भांड्यातील काही भागातील भगर अपक्व राहू शकते (अपूर्ण शिजते) मुख्यत्वे पृष्ठभागावरील मध्यभागी; ज्यामुळे बुरशी पूर्णपणे नष्ट होत नाही व वाटप करण्यास जास्त वेळ लागल्यास बुरशीची परत वाढ होऊन अन्नपदार्थ दूषित होऊ शकतात. त्यामुळे पूर्णपणे शिजल्याची खात्री करुनच भगर शिजवल्यापासून २ ते ३ तासात आत संपवावी. भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच दळा. भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन-तीन दिवस सलग उपवास असतांना या पदार्थांचे सेवन अँसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थांचे सेवन पचनशक्तीनुसार मर्यादेतच करावे. भगरीचे सेवन करतांना या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे संभाव्य अपाय टाळता येईल.
भगर विक्रेत्यांसाठी सूचना
विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी. भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्र., पॅकींग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या.
मुदत बाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये. सुटी भगर व खुले भगर पिठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये. अन्न व औषध प्रशासनाचे वतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई घेण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन अ.ए.चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.













































































