हिवाळ्याचे दिवस सुरू झाले की, शरीराला विशेष काळजीची गरज पडते. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी, पौष्टिक आणि संतुलित आहार हे अतिशय महत्वाचे असते. हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी काही विशेष पदार्थ बनविले जातात. या विशेष पदार्थांपैकी एक आहे बाजरीची खिचडी. बाजरीची खिचडी राजस्थानची सुप्रसिद्ध पारंपरिक रेसिपी आहे. शरीरासाठी पौष्टिक असण्याबरोबरच याची चव देखील उत्कृष्ट अशी आहे. चला तर जाणून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने बाजरीची खिचडी कशी बनवतात.
साहित्य
बाजरी – अर्धा कप
पिवळी मुंग डाळ- अर्धा कप
तूप- १ मोठा चमचा
हिंग- चिमूटभर
जिरे- १ छोटा चमचा
हळद- १/४ चमचा
मीठ- आवडीनुसार
हेही वाचा – आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ही खास भजी …जाणून घ्या रेसिपी
पद्धत
बाजरीला सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धून घ्या. बाजरीला कमीत कमी ८-९ तासांपर्यंत भिजू द्या. बाजरी चांगल्याने भिजल्यानंतर यातील जास्तीचे पाणी काढून घ्या. आता कुकरमध्ये तूप टाकून गरम होऊद्या. तूप गरम झाले की त्यामध्ये जिरे टाका. जिरे तडतडायला लागल्यानंतर त्यात चिमूटभर हिंग आणि हळद टाकून चमच्याच्या मदतीने परतून घ्या. आता कुकरमध्ये बाजरी आणि मुंग डाळ टाकून चांगल्याने परतून घ्या. आता त्यामध्ये आपल्या आवडीनुसार, मीठ घालून कुकरचे झाकण बंद करा. कुकरच्या ४-५ शिट्ट्या घेऊन घ्या. तयार आहे अगदी पौष्टिक आणि चविष्ट बाजरीची खिचडी. राजस्थानमध्ये गरमागरम खिचडीवर तूप आणि पिठी साखर टाकून सर्व करण्याची पद्धत असते. तुम्ही आपल्या आवडीनुसार तूप आणि साखर यात टाकू शकता.