सातारा | जिल्ह्यात घरोघरी जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू आहे. पेरणीचे दिवस असल्याने दिवसभर महिला शेतीचे कामात व्यस्त असतात.अशाच शेतात राबणाऱ्या बहिणींना या योजनेची माहिती देताना शिंगणवाडी येथील अंगणवाडी सेविका गेल्याचे चित्र लक्षवेधी ठरले आहे. तर मोडकवाडी जिंती येथील अंगणवाडी सेविकेने सुध्दा असे अर्ज शेताच्या बांधावर जाऊन भरले आहे.
राज्य सरकारने घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून लाडक्या बहिणींचे अर्ज भरुन घेण्याचं काम सुरू आहे. राज्य सरकारकडून विविध प्रणालींमार्फत राज्यातील पात्र व लाभार्थी महिलांचे अर्ज भरुन घेतले जात असून महिला भगिनींना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.त्यामुळे, जिल्हा प्रशासनही आपल्या स्तरावर अधिक सहज व सुलभ रितीने ही योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
सध्या पेरणीचे दिवस आहे, त्यामुळे महिला दिवसभर शेती कामात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या बांधावर जाऊन अर्ज भरुन घेण्याची प्रक्रिया सातारा जिल्ह्यात राबवली जात आहे. सातारा जिल्ह्यात घरोघरी जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू आहे. पेरणीचे दिवस असल्याने दिवसभर महिला शेतीचे कामात व्यस्त असतात. अशाच शेतात राबणाऱ्या बहिणींना या योजनेची माहिती देण्यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी आणि शेताच्या बांधावर जाताना दिसत आहेत.
केव्हा मिळणार लाडकी बहिणीला पहिला हप्ता
1 जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलै होती. पण, अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून राज्य सरकारकडून या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहेत, त्यावरुन 16 जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. तसेच 1 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.