Last Updated on 28 Dec 2023 8:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit
दुष्काळी भागातील कारखाने देणार 3100 रुपये पहिली उचल…साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना व प्रशासनाच्या बैठकीत निर्णय
सांगली । सांगली जिल्ह्यात अखेर ऊस दराचा तोडगा निघाला आहे.पहिली उचल एकरकमी 3175 रूपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.तर दुष्काळी भागातील कारखान्यांनी 3100 रुपये देण्याचा निर्णय झाला.दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची बैठक झाली.त्यात अखेर तोडगा निघाला.
ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बुधवारी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.या बैठकीला जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली,साखर कारखानदारांच्या वतीने आ.अरुण लाड,राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,सोनहिरा कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम,वसंतदादा (दत्त इंडिया)चे शरद मोरे,तासगाव कारखान्याचे आर.डी.पाटील आदी तसेच स्वाभिमानीचे महेश खराडे,संदीप राजोबा,भागवत जाधव,संजय बेले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ऊस ‘एफआरपी’ साठी साखर उतारा निश्चित
राजारामबापू कारखाना 3 युनिट,हुतात्मा,विश्वास सहकारी,क्रांती,सोनहिरा 2 युनिट,वसंतदादा (दत्त इंडिया),निनाई (दालमिया) आदी साखर कारखाने पहिली उचल एकरकमी 3175 रूपये देणार आहेत.तर उर्वरित दुष्काळी भागातील कारखाने 3100 रुपये पहिली उचल देणार आहेत.
दरम्यान,जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठीच्या आतापर्यंतच्या तिन्ही बैठका निष्फळ ठरल्या होत्या.२६ डिसेंबरच्या बैठकीत कारखानदारांनी 3150 रुपये देण्यास सहमती दर्शवली होती.मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 12.50 उतार्यास 3250, साडेबारा उतार्याच्या आत असणारे 3150 रुपये तर दुष्काळी पट्ट्यातील कारखाने 3100 रुपये दर देतील,असा अंतिम प्रस्ताव दिला.पण,बैठकीत ठोस तोडगा न निघाल्याने 26 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन कारखानदारांनी दिले.तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय स्वाभिमानाने घेतला होता.या मुदतीत तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.कोल्हापूर फॉर्मुल्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातही उसाला दर मिळावा या मागणीसाठी गेली काही दिवस आंदोलन सुरू होते.त्या आंदोलनात स्वतः राजू शेट्टी सहभागी होऊन काटा बंद आंदोलन सुद्धा करण्यात आली.यानंतर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी दर जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची नजर या बैठकीकडे लागली होती.

सावधान! प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेचे फसवे संकेतस्थळ आणि एसएमएस…
Potato Bites । अगदी कमी साहित्यात बनवा क्रिस्पी पोटॅटो बाईट्स…
आरोग्य । सकाळच्या शिळ्या लाळेचे आहेत खूप फायदे
देशात अंडी आणि ब्रॉयलरचे उत्पादनात वर्षाला 8 ते 10 टक्के दराने वाढ












































































