Last Updated on 20 Apr 2026 8:37 AM by Sanjay Patil/Adhorekhit
हुबालवाडी येथील वीटभट्टीवरील घटना
ईश्वरपूर ।
वाळवा तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने हजेरी लावली, मात्र या निसर्गाच्या रौद्ररूपाने हुबालवाडी परिसरात दुर्दैवी घटना घडली. वीटभट्टीवर काम करत असताना अंगावर वीज कोसळल्याने मनोज चौडा यादव (वय ३०, मूळ रा. रायगाव, छत्तीसगड) या मजुराचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास ही घटना घडली.
हुबालवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर वीटभट्ट्या असून, अचानक आलेल्या पावसामुळे तयार विटा वाचवण्यासाठी कामगारांची धावपळ सुरू झाली होती. विटा भिजू नयेत म्हणून प्लास्टिकचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू असतानाच काळाने घाला घातला.
हुबालवाडी येथील माजी सरपंच हौशेराव भोसले यांच्या वीटभट्टीवर मनोज यादव हा काम करत असताना अचानक विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि क्षणातच वीज त्याच्या अंगावर कोसळली. घटनेचा आवाज इतका मोठा होता की परिसर हादरून गेला. काही क्षणांतच मनोज जमिनीवर कोसळला.
त्या वेळी वीटभट्टीवर उपस्थित असलेले हौशेराव भोसले आणि बहेचे माजी सरपंच सुधीर रोकडे हे दोघे व इतर मजूर थोडक्यात बचावले. घटनेनंतर मनोज यादव याला तातडीने उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न झाला, परंतु वीज अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.












































































