Last Updated on 12 Apr 2026 2:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
आपल्या जादूई आवाजाने अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.शनिवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास आणि प्रचंड थकवा जाणवू लागल्यानं तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते, आज त्यांनी जगाचा निरोप घेतला.
त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. १३ एप्रिल) सायंकाळी ४ वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीसह भारतीय संगीत क्षेत्रावर आणि त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आशा भोसले यांनी सात दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये १२,००० हून अधिक गाणी गायली आहेत. १९४३ मध्ये कारकीर्द सुरू केलेल्या आशाताईंनी बालगीते, भावगीते, लावणी, चित्रपट संगीत आणि पॉप गाण्यांमधील अष्टपैलुत्वासाठी नावलौकिक मिळवला आहे. शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चात्य पॉप पर्यंत सर्व प्रकारच्या गाण्यांमध्ये आवाज दिला आहे. त्यांच्या ज्येष्ठ भगिनी लता मंगेशकर यांच्या प्रमाणेच आशा भोसले या अनेक संगीतकारांच्या आवडत्या गायिका होत्या. शंकर जयकिशन, सचिन देव बर्मन, आर.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, खय्याम, बप्पी लाहिरी ते ए.आर. रहमान सारख्या संगीतकारांसोबत केले. तर, सुधीर फडके, वसंत देसाई, हृदयनाथ मंगेशकर यांसारख्या दिग्गज मराठी संगीतकारांसोबत त्यांनी काम केले आहे.
आशा भोसले यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण, २००० मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि दोनदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना १९८१ आणि १९८६ मध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार मिळाला होता. त्यांना सात वेळा फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. १९९६ मध्ये, त्यांना ‘रंगीला’ चित्रपटासाठी फिल्मफेअर विशेष पुरस्कार मिळाला होता. २००१ मध्ये, त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि २००२ मध्ये, ‘लगान’ चित्रपटासाठी आयफा पुरस्कार मिळाला होता. याव्यतिरिक्त, त्यांना १९८७ मध्ये ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ पुरस्कार, २००० मध्ये ‘सिंगर ऑफ द मिलेनियम’ (दुबई) आणि २००२ मध्ये ‘बीबीसी जीवनगौरव पुरस्कार’ मिळाला.












































































