साखराळे येथे ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ कार्यक्रम
सांगली । सरकारे येतात आणि जातात,मात्र सध्या आपल्या देशात व्यक्ती स्वातंत्र्यावर जी गदा आणली जात आहे,ती देशासाठी घातक आहे.देशात महागाईने कळस गाठला असून सामान्य माणूस या महागाईने होरपळला जात आहे.सध्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात सामान्य माणसांच्यामध्ये प्रचंड नाराजी असल्याचे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी साखराळे येथे बोलताना केले.आमचे मित्र (चंद्रशेखर बावनकुळे) काल इस्लामपूर मध्ये माईक घेऊन घरोघरी फिरले.मोदी साहेबांची लोकप्रियता कमी होत असल्याने असे उपक्रम राबविले जात असल्याची टीका त्यांनी केली.
साखराळे येथे ‘एक तास राष्ट्रवादीसाठी,महाराष्ट्राच्या विकासासाठी’या उपक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,माजी सभापती आनंदराव पाटील,सरपंच सुजाता डांगे,राष्ट्रवादी सेवादलाचे साखराळे अध्यक्ष अविनाश पाटील,उपसरपंच बाबुराव पाटील,माजी पं.स.सदस्य शिवाजी डांगे,माजी चेअरमन भास्करराव पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षा अलका माने,ग्रामपंचायत सदस्य रामराजे पाटील,माजी सभापती शैलेंद्र सुर्यवंशी,युवा कार्यकर्ते विनोद बाबर प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले,नांदेडच्या हॉस्पिटल मध्ये औषधांचा तुटवडा झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागणे,हे दुर्दैवी आहे. आमच्या काळात आम्ही औषध खरेदीचे अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. या सरकार ने ते अधिकार आपल्याकडे घेतले होते. आता आम्ही बोलू लागल्यावर अधिकाऱ्यांना औषध खरेदीचे अधिकार दिल्याचा नवा आदेश काढला आहे. सध्या अंगणवाडी शिक्षिकेंचे पगार करायला पैसे नाही. अपंग,वृध्द,विधवा महिला,निराधार व्यक्तींना वेळेवर पेन्शनचे पैसे मिळत नाहीत. मात्र आपल्या साहेबांनी जी २० वर ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत. काम कमी मात्र,जाहिरातीवर हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. सध्या निवडणूका जवळ येतील,तशा विविध सवलती जाहीर केल्या जात आहेत. मात्र जनता आता फसणार नाही.
यावेळी विनोद बाबर यांनी सध्याचे राज्यकर्ते शेतकरी विरोधी असून ते शेतकऱ्यां ची पिळवणूक करीत असल्याचे सांगितले. तर शैलेंद्र सुर्यवंशी यांनी भविष्यात केवळ दलित नव्हे,तर बहुजन समाजाने जागृत रहाण्याचे आवाहन केले.
प्रारंभी अविनाश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जेष्ठ नेते सुबराव डांगे,माजी सरपंच पी.बी.सुर्वे, वसंतराव माने,माजी उपसरपंच तजमुल चौगुले,बाबासो डांगे, सचिन पाटील,नारायण पाटील यांच्यासह गावातील राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य अनिकेत साठे यांनी आभार मानले. रामभाऊ चिवटे यांनी सूत्र संचालन केले.