मुंबई | मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 14 महिन्यात 13 हजाराहून अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी सोपे झाले असून यासाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. सीएमएमआरएफ (‘CMMRF’) या अँप्लिकेशनवर अर्ज भरुन मदत मिळविता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मागील वर्षी पहिल्याच जुलै महिन्यात 178 रुग्णांना 76 लाखांची मदत देण्यात आली.नंतर ऑगस्ट महिन्यात 244 रुग्णांना 1 कोटी 1 लाख,सप्टेंबर महिन्यात 319 रुग्णांना 1 कोटी 86 लाख,ऑक्टोबर महिन्यात 276 रुग्णांना 2 कोटी 35 लाख,नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख,डिसेंबर महिन्यात 1031 रुग्णांना 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 1032 रुग्णांना 8 कोटी 90 लाख तर फेब्रुवारी 2023 मध्ये 1274 रुग्णांना 10 कोटी 59 लाख, मार्च 2023 मध्ये 1369 रुग्णांना 11 कोटी 93 लाख,एप्रिल मध्ये 1190 रुग्णांना 9 कोटी 91 लाख,मे मध्ये 1329 रुग्णांना 11 कोटी 25 लाख,तर जून मध्ये 1728 रुग्णांना 14 कोटी 62 लाख,जुलै 1488 रुग्णांना 12 कोटी 72 लाख,तर ऑगस्ट मध्ये विक्रमी 1567 रुग्णांना 13 कोटी 14 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘गणेश चतुर्थी’ : शास्त्र काय सांगते?…जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते. या निधीचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.