Last Updated on 08 Jul 2023 7:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बऱ्याच दिवसांनी आज सांगली शहरातील नेत्यांच्या सभांचा साक्षीदार ठरलेल्या स्टेशन चौकाला भेट दिली.आता हे सभास्थळ थकले आहे.पूर्वी सांगली मिरज मीटरगेज रेल्वे असताना इथे स्टेशन होते.हा परिसर नेहमी गर्दीने फुलेला असे.
मी आणि माझा मित्र अशोक बाबर ७७ ते ८० या काळात सांगलीच्या कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात शिकत होतो.दुपारी सभा होणार आहे असा रिक्षातील आवाजी प्रचार ऐकला की आम्हा मित्रांचे टोळके साडेसात वाजता चौकात दाखल होई.सभास्थानी उंच बांधकाम असलेल्या व्यासपीठावर ज्या पक्ष्याची सभा असे त्या पक्ष्याचे झेंडे फडकत असत.मोठ्या लॅम्पमुळे प्रकाश सर्वदूर पसरे. चहा,सोडा यांच्या छोट्या गाड्यावरील बत्त्यांमुळे प्रकाश योजना पूरी होई.श्रोत्यांसाठी बऱ्याच वेळा भारतीय बैठक असे.भटकी कुत्री हमखास हजेरी लावत. वक्ते त्यावरही प्रतिक्रिया देत.त्या काळात राष्ट्रशक्ती हे वृत्तपत्र सभांचे सविस्तर वृत्त देई.
आम्ही खासदार जगन्नाथ जोशी,बापूसाहेब काळदाते,मधू दंडवते,जॉर्ज फर्नांडिस,वसंतदादा,राजारामबापू,संभाजी पवार,आण्णा डांगे या नेत्यांच्या सभा या गर्दीने ओसांडणाऱ्या चौकात ऐकल्या.
हेही वाचा : तब्बल 28 वर्षांनी एकत्र आलेल्या सवंगड्यांनी घेतला ‘मैत्री बँक’ सुरू करण्याचा निर्णय
आमचे खरे आकर्षण होते,भाई ताराचंद शहा आणि हिंदू एकताचे नारायण कदम या दोघांची आक्रमक भाषणे आम्हाला आवडायची.अर्थात ते दिवस उत्सुकता, उत्साह,कुतूहालाचे होते.ज्या दिवशी ज्याची सभा होईल तो त्या दिवशी शंभर टक्के बरोबर असं वाटण्याचा तो पौगंडावस्थेतील काळ होता.बऱ्याच दिवसांनी आज हे सभा स्थळ पाहिलं.उंच व्यासपीठाचा रंग उडाला आहे.पूर्वेकडच्या जिना मोडकळीस आला आहे.आता इथे फारशा सभा होत नसाव्यात.सभांचा चौक हे वैभव आता राहिले नाही.काळाच्या ओघात आता आमच्या बरोबर हा सभांचा साक्षीदार चौक ही थकला म्हणायचा!![]()










































































