महिला शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाच्या योजना राखीव ठेवण्यात येणार आहेत.या योजनांचा लाभ व महिलांच्या सन्मानासाठी ‘लक्ष्मी’ योजनेत सातबाऱ्यावर त्यांचे नाव लावता येते.
कृषि क्षेत्रात 20 वर्षापूर्वी महिलांचे नगण्य असणारे प्रमाण वाढतांना दिसत आहे. कृषि महाविद्यालयामंध्ये देखील शिक्षण घेण्यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. पंरतु केवळ 14 टक्के महिलांच्या नावावर शेती असल्याने बँकेचे कर्ज, विविध शासकीय योजनांच्या लाभापासून त्या वंचित राहतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरातील महिलेचे नाव सातबाऱ्यावर लावावे, असे कृषिमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.
धन्वंतरी सभागृह शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी इमारत, महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठ येथे आयोजित महिला शेतकरी परिसंवाद व आत्मा प्रकल्पात जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण काम करणारे शेतकरी व शेतकरी गट पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात कृषी मंत्री दादाजी भुसे बोलत होते.
कृषि क्षेत्राच्या विविध बाबींसाठी निर्णय घेतांना महिलांचा समावेश खूप आवश्यक असल्याचे आजच्या महिला शेतकरी परिसंवाद कार्यक्रमातून सिद्ध झाले आहे. स्वत: निर्णय घेतल्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून त्या शेतीमध्ये अधिक जोमाने काम करतात. महिलांचा सहभाग वाढल्यास शेतीमधील निव्वळ नफ्यामध्ये वाढ होईल. पिकाच्या गुणवत्तेत वाढ होऊन पिकाच्या उत्पादनात वाढ होईल, असा आशावादही श्री.भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.
अशी आहे लक्ष्मी मुक्ती योजना
एखाद्या शेतकऱ्याने लक्ष्मी मुक्ती योजनेत स्वखुशीने आपल्या जमिनीत पत्नीच्या नावाची नोंद सहहिस्सेदार म्हणून करायची असेल तर त्याने विनंती केल्यास तशी नोंद फेरफार उताऱ्यात केली जाते.
पतीच्या निधनानंतर त्या महीलेचे वासरा हक्काने व वारस तपासाच्या फेरफाराने नाव चढते ही महाराष्ट्र महसुल अधिनियम 1966 ची तरतुद आहे.
परंतू महिलेच्या पतीच्या हयातीत तीचे नाव तीच्या पतीच्या जमिनीच्या 7/12 सातबारा सदरी वडीलोपार्जित मालमत्तेत नाव लावण्याची तरतुद महाराष्ट्र महसुल व वन विगागाच्या १५ सप्टेंबर १९९२ च्या परिपत्रकानुसार करण्यात आली आहे.
सातबारावर पतीच्या नावाबरोबरच पत्नीचे नावही नोंद करण्यासाठी शासनाने लक्ष्मी मुक्ती योजना कार्यान्वित केली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वानी आग्रही रहावे.महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनण्यासाठी लक्ष्मी मुक्ती योजना उपयुक्त ठरत असल्याचे आपल्याला दिसून येते.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीचे नाव 7/12 उताऱ्यावर लावण्यासाठी तलाठी कार्यालयात पत्नीच्या सहमती अर्ज करावा.
राज्यातील शेतकऱ्यांच्या पत्नीला त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीतील वाटा मिळवून देण्याचे संपूर्ण श्रेय शरद जोशी यांना आहे. पतीच्या निधना नंतरही त्या शेतकरी महिलेला सन्मानाने जगता यावे याकरिता शरद जोशी यांनी‘लक्ष्मी मुक्ती’ कार्यक्रम ही मोठी चळवळ उभारली होती. शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीच्या नावे जमिनीची मालकी करून देण्याची ही चळवळ तेव्हा सुरू झाली. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे १९८६ मध्ये शेतकरी संघटनेची जाहीर सभा झाली. त्यातच पत्नीच्या नावावर शेतकऱ्यांनी जमिनी करून द्याव्यात, असा ठराव पारित करण्यात आला.
१५ सप्टेंबर, १९९२ला महसूल आणि वन विभागाने याबाबत परिपत्रक काढले होते.