Last Updated on 01 Dec 2023 11:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । येत्या ७ तारखेला जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांची बैठक घेवून दरावर तोडगा काढू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने रात्री उशिरा स्वाभिमानीने साखराळे येथील राजारामबापू साखर कारखान्यावरील आपले आंदोलन स्थगित केले.प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते,माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली. ७ तारखेच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास १० डिसेंबरला पुन्हा पुणे – बेंगलोर महामार्गावर ठिय्या मांडण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
ऊस दरासाठी शुक्रवारी सकाळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील साखराळे येथील राजारामबापू कारखान्यात घुसत उसाच्या गाळपासाठी असणाऱ्या गव्हाणीत थेट उड्या मारुन गाळप बंद पाडण्याचा प्रयत्न केला.राजू शेट्टी यांनी राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या दारात ठिय्या ठोकत आंदोलन सुरु केले होते.
दरम्यान,राजू शेट्टी व प्रशासनात झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.७ किंवा ८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार व प्रशासन यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांनी सांगितले. ८ तारखेला तोडगा न निघाल्यास १० तारखेस सकाळी १० वाजल्यापासून बेमुदत राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला.
आंदोलन स्थगितीची माहिती देताना राजू शेट्टी म्हणाले, आज सायंकाळपासून प्रशासनाबरोबर सातत्याने चर्चा चालू होत्या.कारण हे आंदोलन कोणा एका कारखान्याच्या विरोधात नाही किंवा कोणा एका व्यक्तीच्या विरोधात नाही हे आंदोलन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी होतं.आम्हाला माहीत होतं की ज्या ठिकाणी आंदोलन करायला पाहिजे त्या ठिकाणी आंदोलन केल्यानंतरच निर्णय होणार आहे.असे प्रश्न हे चर्चेतून सुटतात हा गेल्या 25 30 वर्षाचा आमचा अनुभव आहे.अनेक बैठका झाल्यानंतर अखेर कोल्हापूरचा सुद्धा असाच फॉर्मुला झाला होता.आता कुठला फॉर्मुला आम्ही स्वीकारणार नाही आम्ही जो फॉर्मुला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून केलेला आहे त्याला मान्यता देणे व सांगली जिल्ह्याला तो लागू करणे एवढाच भाग आहे.
हेही वाचा – ऊस दरावरून संघर्ष! राजारामबापू साखर कारखान्याच्या गव्हाणीत कार्यकर्त्यांनी घेतल्या उड्या
ते म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने अर्जुन श्रीनिवासन यांनी सांगितलं की दिनांक ६, ७ व ८ यापैकी एका तारखेला बैठक घेतली जाईल.आठ तारखेच्या आत बैठक होणार असेल तर आमची काही हरकत नाहीअट एकच आहे की सगळ्या कारखान्यांच्या चेअरमननी त्या बैठकीला यावं आणि जो काही निर्णय त्या ठिकाणी होईल तो मान्य करावा ही आमची भूमिका आहे.प्रशासनावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी खात्री दिलेली आहे म्हणून विश्वास ठेवलेला आहे.पण प्रशासनाने यामध्ये काय हायगय काय केली तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की दहा डिसेंबरला राष्ट्रीय महामार्ग बंद करणार आहोत.ज्या पद्धतीने कोल्हापूरचा राष्ट्रीय महामार्ग रोखला होता त्याच पद्धतीने राष्ट्रीय महामार्ग रोखून आम्ही आमचा आंदोलन करू.त्यावेळी भांडण आमचं व सरकारचे असेल कारण सरकारने आम्हाला या ठिकाणावरून उठवलेले आहे.आम्ही कोणा कारखान्यावर विश्वास ठेवलेला नाही,कोणा व्यक्तीवर विश्वास ठेवलेला नाही तर प्रशासन म्हणून जिल्हाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवला आहे.त्यांनी जर का तो विश्वास सार्थ ठरवला नाही आणि आमची फसवणूक झाली तर मात्र राष्ट्रीय महामार्ग रोखल्यानंतर प्रशासनाने आमच्याबरोबर समझोता करण्याच्या भानगडीत पडू नये.आर या पार ची ती लढाई असेल.कोल्हापूरच्या फॉर्मुलाप्रमाणे ज्यांनी गेल्या वर्षी तीन हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम दिली आहे त्यांनी पन्नास रुपये व 3000 पेक्षा कमी रुपये दिलेले आहेत त्यांनी शंभर रुपये हा जो कोल्हापूरचा फॉर्मुला आहे त्यापेक्षा आम्ही त्यापेक्षा आम्ही कोठेही मागे हटणार नाही आणि यावर्षीची एफआरपी जी निघते गेल्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधाराने त्या एफआरपी च्या वर शंभर रुपये ही पहिली उचल असेल.हा सुद्धा फॉर्मुला कोल्हापूरच्या सगळ्या कारखान्यांनी मान्य केला आहे आणि सांगलीतील कारखान्यांनी ही तो मान्य करावा अन्यथा आमची लढाई ही आरपारची लढाई असेल.












































































