Last Updated on 07 Jan 2024 8:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतातील समस्त स्त्रियांना ज्ञानाची वाट खुली करून दिली.मुलींनी मिळालेल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करावा. शिक्षण गांभीर्याने घ्यावे.शिक्षणाबरोबरच व्यावसायिक कौशल्ये विकसित करावीत असे आवाहन प्रा. मानसी पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व शिक्षिका दिनामध्ये त्या ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व आजची स्त्री’ या विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर होते.
त्या पुढे म्हणाल्या,आपली खरी ओळख ही सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच झाली आहे.त्याआधी स्त्री एक उपभोगाची वस्तू होती.सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्त्रियांनी शिक्षण,व्यवसाय,उद्योग व नोकरी यामध्ये आपला ठसा उमटवावा.आपल्या आदर्श सावित्रीबाई फुले असाव्यात.पुरुष प्रधान संस्कृती उद्योजकतेमध्ये सुद्धा दिसून येते.स्त्री उद्योजकांशी पुरुष उद्योजक बिजनेस डील करत नाहीत असे दिसून येते.मुलींनी नेतृत्व गुण व निर्णय क्षमता विकसित कराव्यात. जेव्हा स्त्रीला अर्थव्यवस्थेमध्ये स्थान मिळेल तेव्हाच देशाचा जीडीपी वाढेल.
शिक्षिका दिनानिमित्ताने विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचे एक दिवसाचे अध्यापनाचे कामकाज पाहिले.प्राचार्य म्हणून कु. वैभवी पाटील व उपप्राचार्य म्हणून कु. साक्षी चाळके यांची निवड झाली.सर्व शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनींचे सत्कार करण्यात आले.संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राम घुले यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. वर्षा पाटील यांनी केले.प्रास्ताविक प्रा. मेघमाला पाटील तर आभार प्रा. रंजना पवार यांनी मानले.महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता.












































































