Last Updated on 07 Sep 2023 12:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जालना | सरकारचा निर्णय चांगला आहे.आम्ही सरकारच्या निर्णयावर दहा पावलं मागे यायला तयार आहोत.पण,सरकारने एक काम केले पाहिजे.आम्ही सूचवलेली दुरुस्ती तेवढी केली पाहिजे.त्यांनी जीआर दुरुस्त करून आणला पाहिजे.तरच संपूर्ण न्याय झाला असे म्हणता येईल.नाही तर आम्हाला न्याय झाला नाही असंच म्हणावे लागेल,अशी भूमिका पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील आपली मांडली.तसेच आमची सरसकट प्रमाणपत्राची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही,तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, त्यांनी यावेळी जाहीर केले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 10 दिवस आहे.दरम्यान, आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.काल ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखला देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.त्यांच्या या निर्णयाचे मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत केले आहे.
सरकारने काल मराठा आरक्षणासंदर्भात आदेश काढले पण या आदेशाची प्रत आमच्यापर्यंत आली नाही.काही माध्यमांकडून काही महत्वाचे मुद्दे कळाले आहे.मराठा समाजातल्या ज्या लोकांकडे कुणबी असल्याची नोंद आहेत,त्यांना आजपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.पण सर्व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे.तसेच सरसकट प्रमाणपत्र देण्यासाठी एक महिन्याची वेळ सरकारने मागितली आहे.वंशावळी असणाऱ्यांना मराठा आरक्षण मिळणार आहे.परंतु, आमच्याकडे वंशावळी नाहीत.त्यामुळे कालच्या निर्णयाचा काहीच फायदा होणार नाही.त्यामुळे यात सुधारणा केली पाहिजे,अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
सरकसकट प्रमाणपत्र देण्यासाठी माजी न्यायामूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.ती समिती एक महिन्यात निर्णय देणारआहे.आजची परिस्थिती पाहता आम्ही हट्टाला पेटलो नाही.पेटणार नाही.पण,सरकारनेही पेटू नये.आमची मागणी मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र देण्याची आहे. कालचा सरकारचा अध्यादेशाचे स्वागत करतो.मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला.सरकारने यापूर्वीही मोठमोठे निर्णय घेतले त्याच धर्तीवर हा निर्णय घेतला.त्याचे कौतुक आहे.परंतु ज्यांच्याकडे वंशावळीचे दस्ताऐवज असतील त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.पण आमच्याकडे वंशावेळीचे दस्ताऐवज नाही.त्यामुळे आम्हाला एक टक्काही फायदा होणार नाही,असे जरांगे पाटील म्हणाले.












































































