Last Updated on 23 Nov 2023 5:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
रविकांत तुपकरांची शिष्टमंडळासमवेत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत सोयाबीन-कापूस प्रश्नी चर्चा…
आ.डॉ.राजेंद्र शिंगणे,जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील व पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची उपस्थिती
बुलढाणा । जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत रविकांत तुपकर यांनी आज (दि.23 नोव्हेंबर) विश्रामगृह येथे सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.यावेळी आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक सुनील कडासने उपस्थित होते.
यावर्षी येलो मोझँक,बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.यावर्षी शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट आहे.या शेतकऱ्यांच्या खऱ्या व्यथा रविकांत तुपकर यांनी ना.दिलीप वळसे-पाटील यांच्यासमोर मांडल्या. सरकारने तातडीने सोयाबीन-कापूस दरवाढ व दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रु नुकसान भरपाई व यासह इतर मागण्यांवर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून ठोस निर्णय घेण्याची विनंती केली.यासंदर्भात त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली.

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी पेटून उठला आहे.20 नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात हजारो शेतकऱ्यांचा एल्गार महामोर्चा निघाला,मोर्चात सरकारविरोधात शेतकऱ्यांनी मांडलेल्या संतप्त भावनाही रविकांतभाऊंनी त्यांच्यासमोर मांडल्या.जर सरकारने 28 नोव्हेंबर पर्यंत सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर 28 नोव्हेंबर हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने निघतील व 29 नोव्हेंबरला मंत्रालयाचा ताबा घेतील,या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचे रविकांत तुपकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ॲड.नाजीर काझी,तुकाराम अंभोरे-पाटील, विनायक सरनाईक, नितीन राजपूत, ॲड. राज शेख, मोहम्मद अझहर, पवन देशमुख, दत्तात्रय जेऊघाले, आकाश माळोदे, रामेश्वर अंभोरे, रवींद्र जेऊघाले, गजानन देशमुख, विजय जेऊघाले यांच्या पदाधिकारी उपस्थित होते.













































































