Last Updated on 10 May 2023 11:10 AM by Sanjay Patil/Adhorekhit
गेल्या 28 दिवसांपासून ठप्प झालेली कामे आता आजपासून पूर्ववत सुरु होणार
पुणे । मनरेगाच्या आयुक्तांनी संघटनेच्या प्रलंबित मागण्याच्या अनुषंगाने येत्या 30 मे 2023 पर्यत आदेश निर्गमित करण्याचे आश्वासन दिल्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामावर राज्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी टाकलेला बहिष्कार मंगळवारी अखेर मागे घेतला.बहिष्कारामुळे ब्रेक लागलेली रोहयोची कामे आता आजपासून पूर्ववत सुरु होणार आहेत.
मजुरांच्या उपस्थितीबाबत गटविकास अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार नाही.याबाबत अध्यादेश काढावा,यासह विविध मागण्या पूर्ण होत नसल्याने मनरेगाच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित संघटनेने घेतला होता.त्यामुळे राज्यभरातील गटविकास अधिकाऱ्यांनी मनरेगाच्या कामावर बहिष्कार टाकला होता.त्यामुळे गेल्या 11 एप्रिलपासून म्हणजेच 28 दिवस रोहयोची कामे ठप्प झाली होती.
केंद सरकार आणि राज्य सरकार यांच्या योजनेअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजना पंचायत समितीअंतर्गत मोठ्या प्रमाणात राबविण्यात येते.’रोहयो’ मध्ये ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी गावातच काम उपलब्ध करून देण्याची मुख्य भूमिका पंचायत समितीची राहते.‘रोहयो’अंतर्गत रस्ते,पाणंद रस्ते तयार करणे,माती नालाबांध बनवणे,वनराई बंधारा,सामूहिक शेततळी,गावतलाव,साठवण तलाव,जैविक बंधारा,खारजमीन विकास बंधारा, पाझर तलावातील गाळ काढणे,रोपवाटिका,कालव्याची दुरुस्ती,नूतनीकरण व अस्तरीकरण,सिंचन विहीर आदी कामे केली जातात.यामुळे ग्रामीण भागामध्ये मजुरांना रोजगार उपलब्ध होतो.
मंगळवारी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार,रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार तसेच मनरेगाचे आयुक्त शंतनू गोयल यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.संघटनेच्या प्रलंबित मागण्याच्या अनुषंगाने येत्या 30 मे 2023 पर्यत आदेश निर्गमित करण्याच्या आश्वासन यावेळी देण्यात आले.सकारात्मक चर्चा झाल्याने बहिष्कार मागे घेण्यात आला.याबाबत संघटनेचे अध्यक्ष सुरेश बेदमुथा व सरचिटणीस वासुदेव सोळंके यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.त्यामुळे रोहयोची ठप्प झालेली कामे पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.
हेही वाचा…
इंडिया पोस्ट आता कोट्यवधी व्यापाऱ्यांसाठी बनले लॉजिस्टिक भागीदार
हेही वाचा…










































































