रामलिंग बेटावर वाढू लागली पर्यटकांची गर्दी
सांगली । प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व प्राप्त झालेल्या व पश्चिम महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बहे (ता.वाळवा) येथील रामलिंग बेटावर तरुण-तरुणींसह कौटुंबिक पर्यटकांची गर्दी होत आहे.विशेषकरून शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत.
रामलिंग बेटामुळे प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व
राजकारण,समाजकारण,अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेले गाव म्हणून बहे गावाची ओळख.तरी या गावची खरी ओळख कृष्णा नदी पात्रात असणाऱ्या ‘रामलिंग बेटा’मुळे संपूर्ण देशभर आहे.बहे गावच्या पश्चिमेस असणारे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून रामलिंग बेटाचा उल्लेख रामायण काळापासून केला जातो.या गावाला येथील रामलिंग बेटामुळे प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे.इस्लामपूर पासून १० कि.मी. व कृष्णा कारखान्यापासून सुमारे ७ कि. मी. अंतरावर कृष्णेच्या तीरावर हे बेट वसलेले आहे.
निसर्गाचं वरदान
‘रामलिंग बेट’ हे गावाच्या पश्चिमेला कृष्णा नदीच्या पात्रात अंदाजे १ कि.मी. लांब व अर्धा कि.मी. रुंद असलेल्या खडकावर तयार झाले आहे. कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचं वरदान या गावाला लाभलेले आहे.धार्मिक साहित्यात याचे अनेक दाखले मिळतात.मंदिराकडे जाण्यासाठी नदीतून कठडे बांधले आहेत,त्यावरून चालत जाता येते.मंदिराच्या परिसरातील वड,चिंच व इतर झाडे यांची थंडगार सावली आहे.तिथेही शांत वातावरणात भैरवी रागात गाणं म्हणणाऱ्या पाण्याचा सूर ऐकू येतो.रामलिंग बेटावर सर्वात उंच अशा मध्यभागी श्री.रामलिंग देवालय असून ते सर्वात पुरातन आहे.प्रभू रामचंद्र हे वनवासाच्या काळात हे नैसर्गिक तीर्थक्षेत्र पाहून येथे विसावले आणि स्नान करून स्वहस्ते वाळूचे लिंग तयार करून शिव शंकराची पूजा केली म्हणून यास रामलिंग असे म्हणतात.येथे संथ वाहणारे कृष्णेचे पाणी बोडक्या दगडावरून वाहते.
हनुमान उपासकांची दर शनिवारी गर्दी
गेल्या पाच-सहा महिन्यापासून या बेटावर तरुण-तरुणींसह कौटुंबिक पर्यटकांची गर्दी होत आहे.जुन्या काळातील उंच बांधलेला पूल.त्याच्याखाली काळ्याशार बोडक्या दगडावरून जाणारे निळे पाणी मन मोहून घेते.छोट्या बंधाऱ्यावरून चालताना तर प्रत्यक्ष नदीतून चालत असल्याचा प्रत्यय येतो.पावसाळ्यात पावसाने रौद्ररुप धारण केल्यानंतर हा परिसर पाण्याखाली जातो.पण,नुकत्याच संपलेल्या श्रावण महिन्यांत काही दिवसांचा अपवाद वगळता याठिकाणी भाविकांची गर्दी होती.पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याचा कालावधी पर्यटनाकरिता जायला योग्य असतो.अनेक हनुमान उपासक शनिवारी येथे गर्दी करतात.
सिनेसृष्टीचे आकर्षण;.’प्री वेडिंग’ शूटसाठीही छायाचित्रकारांचा ओढा
बेटावर सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातुन विविध झाडे लावली आहेत त्यामुळे बेटावर वनराई नटलेली आहे.हा परिसर आता सिनेसृष्टीचे आकर्षण ठरत आहे.’प्री वेडिंग’ शूटसाठीही छायाचित्रकारांचा ओढा याठिकाणी वाढला आहे.रामदुत फौंडेशनचे ‘स्वच्छता दुत’ येथील स्वच्छता राखण्यासाठी नेहमी तत्पर असतात.
रामलिंग बेटावर कसे याल ?
इस्लामपूर मार्गे बहे ते रामलिंग बेट.
कोल्हापूर मार्गे येवलेवाडी ते दंड भाग व रामलिंग बेट.
कराड मार्गे रेठरे कारखाना, नरसिंहपूर ते रामलिंग बेट.