Last Updated on 27 Nov 2024 9:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यात महायुतीच्या सरकार स्थापनेबाबत भाजपाचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेते अमित शहा यांच्याशी संपर्क साधून सरकार स्थापनेत आपला कोणताही अडसर नसेल, याची ग्वाही दिल्याचंही शिंदे यांनी सांगितलं
लाडकी बहीण योजनेमुळे कोटयवधी बहिणींचं अपार प्रेम मिळालं, त्यामुळे निर्माण झालेली सख्खा भाऊ ही ओळख कोणत्याही पदापेक्षा मोठी असल्याचं ते म्हणाले. विकासकामं , झटपट निर्णय, आणि सकारात्मकता यामुळे मतांचा वर्षाव होत हा प्रचंड विजय मिळाला आहे,यात राज्यातलं विकास कामांसाठी झपाटलेलं सरकार आणि केंद्रातलं समविचारी सरकार यामुळे मोठा विकास घडून आला. केंद्र सरकारनं या काळात राज्याला मोठं पाठबळ दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेते अमित शहा यांचे आभार मानले. गेल्या अडीच वर्षात जनतेसाठी खूप काही करता आलं, या कार्यकाळाबद्दल समाधानी आणि आनंदी असल्याचं त्यांनी सांगितलं.
बंड करत उचललेली मोठी जोखीम कोणत्याही पदासाठी नव्हती, महाराष्ट्राच्या हितासाठी हे पाऊल उचललं होतं, शेवटच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या थेंबापर्यंत महाराष्ट्राच्या विकासासाठी अविरत झटत राहीन, असा निर्धारही त्यंनी व्यक्त केला.












































































