Last Updated on 06 Nov 2023 11:42 AM by Sanjay Patil/Adhorekhit
‘
मुनावळे येथील पर्यटन स्थळाच्या जागेची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
सातारा | सातारा जिल्ह्यातील मुनावळे (ता. जावळी) येथे अत्याधुनिक, सर्व सोयींनीयुक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यात येत आहे. या नियोजित मुनावळे पर्यटनस्थळाची मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.
मुनावळे पर्यटनस्थळाच्या माध्यमातून 105 गावातील स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. तसेच कांदाटी खोऱ्यात आणखी पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, त्यातून स्थानिकांना त्यांच्या घराजवळ रोजगार मिळणार आहे.याचा फायदा स्थानिक व येथे येणाऱ्या पर्यटकांनाही होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.
मुनावळे येथे स्कुबा डायव्हिंग,बनाना राईड, जेट स्की,हाऊस बोट,बोट क्लब यासह पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येत आहेत.हे सर्व करताना सुरक्षेचा संपूर्ण विचार करण्यात आला आहे.निरीक्षण मनोरा,पर्यटकांसाठी चेंजिंग रूम आदी सोयीदेखील याठिकाणी करण्यात येणार आहेत,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मासेमारीसाठी स्थानिकांना परवानगी देण्यात यावी,जलाशयामध्ये मत्स्यबीज सोडावे.अतिरिक्त भू संपादन झालेल्या जमिनींचा प्रश्न जिल्हाधिकारी यांनी विशेष शिबिर घेऊन मार्गी लावावा,अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान,मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून वासोटा किल्ला,नागेश्वर मंदिर, अहिरे पुल, बामणोली परिसराची हवाई पाहणी केली.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी,पुरुषोत्तम जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.











































































