Last Updated on 29 Apr 2022 7:09 AM by Sanjay Patil/Adhorekhit
बहे सोसायटीने उत्पन्नाचे नव-नवे स्तोत्र निर्माण करून सभासदांना नव- नवीन सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या – पालकमंत्री जयंत पाटील यांचे गौरवोद्गार
सांगली ।
गावा-गावातील सर्व सेवा सोसायट्या या त्या-त्या गावाच्या अर्थ वाहिन्या असून ज्या गावातील सेवा सोसायटी आदर्श,त्या गावाच्या विकासाला अधिक चालना,हे सूत्र आहे.बहे सर्व सेवा सोसायटीने उत्पन्नाचे नव-नवे स्तोत्र निर्माण करून आपल्या सभासद शेतकऱ्यांना नव- नवीन सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचे गौरवोद्गार राज्याचे जल संपदा मंत्री,जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी काढले.
बहे (ता.वाळवा) येथील बहे सर्व सेवा सोसायटीच्या मंगल कार्यालयाचे विस्तारी करण,रामलिंग मिल्क शॉपी उदघाटन व राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील यांच्या फोटोचे अनावरण समारंभात ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ.मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी होते. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील, संचालक विठ्ठलतात्या पाटील,राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, उपाध्यक्ष शशिकांत पाटील,सभापती शुभांगी पाटील,अँड.चिमणभाऊ डांगे,देवराज पाटील,विजयराव पाटील,बाळासाहेब पाटील,संजय पाटील,शहाजी पाटील,लिंबाजी पाटील,सुस्मिता जाधव,सुनीता देशमाने,संग्राम जाधव,देवराज देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
ना.पाटील म्हणाले,आपल्या संस्थेस १०३ वर्षे पूर्ण झाली आहेत. आपली वार्षिक उलाढाल २८ कोटींच्यावरती आहे. आपली संस्था जिल्ह्यातील अग्रमानांकित संस्थापैकी एक आहे,याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. आपण भविष्यातही एकसंघपणे या संस्थेच्या प्रगतीस अधिक चालना द्यावी. विठ्ठलतात्यांनी गावातील गोर-गरिबांची सेवा करीत सेवा सोसायटी व गावाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान केलेले आहे.
आ.मानसिंगराव नाईक म्हणाले,जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सेवा सोसायट्या अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सेवा सोसायट्यांनी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी काय-काय करायला हवे,याचे प्रशिक्षणही देत आहोत.
पी.आर.पाटील म्हणाले,ज्या-ज्या सहकारी संस्थांतील संचालक मंडळाने विश्वस्ताची भूमिका पार पाडली,त्या संस्थांनी प्रगती केल्याचे दिसते. आमच्या गावातील सेवा सोसायटीची वार्षिक उलाढाल चार लाख होती. मात्र ना.जयंतराव पाटील यांनी माझ्या गावासह तालुक्यात पाणी आल्याने या सोसायटीची वार्षिक उलाढाल साडेचार कोटी झाली आहे. नेताजीराव पाटील म्हणाले,बहे सेवा सोसायटीने सातत्याने शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे.
विठ्ठलराव पाटील म्हणाले, ना.जयंतराव पाटील यांचे मार्गदर्शन व पाठबळाने आम्ही वाटचाल करीत आहोत.भविष्यातही संस्थेच्या प्रगतीचा वेग कायम ठेवू. यावेळी राजारामबापू बँकेचे संचालक बाबुराव हुबाले,कृष्णेचे संचालक अविनाश खरात यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी संजय हुबाले,दिनकर पाटील,मुनीर मुल्ला, संजय साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी बहे सर्व सेवा सोसायटीचे अध्यक्ष संजय हुबाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी माजी सभापती शिवाजीराव पाटील,माजी अध्यक्ष सीताराम हुबाले,सरपंच छायाताई पाटील,सोसायटीच्या उपाध्यक्षा लिलावती पाटील,माजी सभापती एच.आर.पाटील,माजी सभापती विलासराव पाटील,माजी सभापती अशोकराव देशमुख,सरपंच सौ. छायाताई पाटील,महिला राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षा सौ.वैशाली पाटील,माजी सरपंच सुधीर रोकडे यांच्यासह गावातील मान्यवर व सभासद उपस्थित होते. दिनकर पाटील यांनी आभार मानले.













































































