Last Updated on 17 Feb 2025 11:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गडकरी यांना इस्लामपुरात बोलावले त्याचा वेगळा अर्थ काढू नका; जयंत पाटील यांनी दिला चर्चेला पूर्णविराम
सांगली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात एक गोंधळ उडाला होता. चर्चा सुरू होती की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असू शकतात. या चर्चेला अधिक धार आली, जेव्हा आज इस्लामपूरातील राजारामबापू इन्स्टिट्यूटमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वस्तीगृह आणि व्यायाम शाळेचे उद्घाटन झाले. यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी पत्रकारांनाच टोला लगावला आहे. ते म्हणाले, आता गडकरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार अशी बातमी करू नका म्हणजे झालं.
इस्लामपूर येथे राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (RIT) येथे आंतरराष्ट्रीय वसतिगृह आणि जिम्नॅशिअम इमारतीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खा. विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आ. अरूण लाड, आ. रोहित पाटील, आ. सुहास बाबर, माजी आमदार मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक, संस्थेचे अध्यक्ष भगतसिंह पाटील, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील आदींसह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते. गडकरी यांना इस्लामपुरात बोलावले त्याचा वेगळा अर्थ काढू नका असे सांगत जयंत पाटील यांनी भाजपात जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
नेमके काय म्हणाले जयंत पाटील…
माझे जाणकार पत्रकार मित्र देखील हल्ली काहीबाही बातम्या पसरवत आहेत याचे दुःख वाटतं. आता माध्यमांनी केद्रिय मंत्री गडकरी राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या प्रसारित करू नयेत असा मिश्किल सल्ला देत असे चिंतन करणार्या माध्यमांच्या कृतीचे शल्य वाटते. त्यावर आता मोठमोठे नामांकित पत्रकार सुद्धा बोलू लागले आहेत, याचं आश्चर्य वाटतं. आज गडकरी साहेब आलेत. दोन पक्षाची माणसं एका व्यासपीठावर चांगल्या उद्देशाने येऊ शकत नाहीत अशीच पत्रकारांची धारणा झालेली आहे अशी खंत आ. पाटील यांनी व्यक्त केली. गडकरी यांना इस्लामपुरात बोलावले त्याचा वेगळा अर्थ काढू नका असेही ते म्हणाले. येथे उद्योगपती स्व. रतन टाटा व अनेक विरोधी पक्षातील नेते आलेले आहेत. हे शैक्षणिक संकुल आहे या व्यासपीठावर राजकारण आणू नये हे माझं मत आहे.
जयंत पाटील यांनी गडकरींच्या कार्याची प्रशंसा केली आणि सांगितले, देशभरात रस्ते निर्मितीचा विषय निघाला की गडकरी साहेबांचे नाव अभिमानाने घेतले जाते. अलीकडे गेल्या १० वर्षांपासून ऊसापासून इथेनॉल निर्मितीला त्यांनी चालना दिली. अशा प्रयोगशील व्यक्तिमत्वाने आपल्या इन्स्टिट्यूटला भेट द्यावी ही आम्हा सर्वांची इच्छा होती. आज त्यांनी आवर्जून उपस्थित राहत आपली इच्छा पूर्ण केली, त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो. पेठ नाक्यापासून सांगलीचा रस्ता उत्तम दर्जाचा झालेला आहे. त्यामुळे या भागातील जनतेच्या वतीने मी गडकरी साहेबांचे विशेष आभार मानतो. एस्टिमेट कॉस्टच्या ४६ टक्के कमी किंमतीत हा रस्ता बनवला आहे.राज्य सरकारने गडकरी साहेबांचा आदर्श घेतला पाहिजे.
ते म्हणाले, ग्रामीण भागात असून देखील आपल्या इन्स्टिट्यूटने शिक्षणाचा दर्जा उत्तरोत्तर वाढवला आहे. येथील विद्यार्थी सृजनशील आहेत. त्यांना दर्जेदार आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी आमचा प्रयत्न असतो. सुमारे २०८ विद्यार्थ्यांना सामावून घेणारी भव्य इमारत आपण उभारली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्यासाठी सुसज्ज अशी व्यायाम शाळा देखील उभारली आहे.
गडकरी नेमके काय म्हणाले?
गडकरींनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले की, “आजचा कार्यक्रम राजकीय नाही. जयंत पाटील माझे चांगले मित्र आहेत, म्हणून मी येथे उपस्थित आहे. राजकारण केवळ निवडणुकीपुरतेच असावे. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते, ‘निवडून आला नाही तर तुम्ही पक्षाचे, आमदार, खासदार झाला तर जनतेचे, आणि मंत्री झाला तर देशाचे असावे.’”
कार्यक्रमात गडकरींनी ‘राजकारणातील तिखट टीका’ आणि ‘मीडिया न करता असलेल्या शंकेवर संवेदनशील होण्याची गरज नाही’ असे सांगत, ‘विकासाच्या राजकारणावर’ लक्ष केंद्रित करण्याची महत्त्वाची भूमिका व्यक्त केली.
शेवटी, जयंत पाटील आणि गडकरी यांच्यातील संवादाने स्पष्ट केले की, राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांनी शिक्षण, विकास, आणि जनकल्याणावर लक्ष केंद्रित केलं आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 30 Oct 2026 9:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit बाह्यरुग्ण तपासणीसह घरभेटी, टेलिमेडिसिन आणि १४ प्रकारच्या प्रयोगशाळा तपासण्यांवर भर मुंबई | राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना घराजवळच दर्जेदार,... Read more













































































